Barsu Refinery : उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचे आधी समर्थन, आता घूमजाव

Barsu Refinery : उद्धव ठाकरे गटाच्या आमदाराचे आधी समर्थन, आता घूमजाव

राजापूर : कोकणातील स्थानिक ग्रामस्थाना काम मिळावे यासाठी राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) उद्धव ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray group) आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी समर्थन केलेले दर्शविले होते, परंतु आता त्यांनी माघार घेतली आहे. आंदोलकांवर पोलिसांनी दिलेली वागणूक माझ्या जिव्हारी लागल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी मंगळवारी (२ मे) रत्नागिरी (Ratnagiri) येथे आयोजित पत्रकार परिषदेत वक्तव्य केले.

राजन साळवी म्हणाले, “उद्धव ठाकरे माझे दैवत आहेत. त्यामुळे ते देतील तो आदेश मला मान्य असेल. खासदार विनायक राऊत यांनी बारसूचा दौरा केला, तेव्हा मी देखील तिथे होतो. मी रिफायनरीला समर्थन दिले, परंतु स्थानिकांमध्ये माझ्याबाबत रोष असल्यामुळे मी पुढे गेलो नाही. विनायक राऊत आणि इतर सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर मी त्यांना रात्री उशीरा राजापूर पोलीस ठाण्यात जाऊन भेटलो.

उद्धव ठाकरे देतील तो आदेश मला मान्य
बारसू रिफायनीप्रकरणी आंदोलन करणाऱ्या स्थानिकांवर पोलिसांनी केलेला लाठीमार मनाला वेदना देणारा होता. बारसू रिफानरी आल्यावर स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल आणि राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी माझी भूमिका जाहीर केली होती. पण त्यानंतर माझ्याविरोधात चार गावांमध्ये रोष निर्माण झाला. मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो, मात्र पोलिसांनी आंदोलकांवर केलेला लाठीमार मनाला वेदना देणारा होता. जनतेशी संवाद साधून राज्य सरकार यातून मार्ग काढेल, असे मला वाटले होते. पण आंदोलकांवर ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचे समर्थन मी करू शकत नाही. म्हणून मी या भूमिकेवरून माघार घेतली आहे. येत्या शनिवारी उद्धव ठाकरे बारसूमध्ये येणार आहेत. त्यावेळी ते देतील तो आदेश मला मान्य असेल, असेही राजन साळवींनी शेवटी सांगितले.

कोकणवासीयांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ विरोधकांनी थांबवावा
दरम्यान, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले की, बारसू रिफायनरी प्रकल्पासंदर्भात कोकणवासीयांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ विरोधकांनी थांबवावा. कारण स्थानिक ग्रामस्थ लाचार नाही तर स्वाभिमानी आहोत. त्यामुळे शासनाने चार दिवसांत जमिनीला दर जाहीर करावा. जमीनीला योग्य दर मिळाला आणि स्थानिकांनी मंजूरी दिली तर प्रकल्प होईल नाहीतर रिफायनी दुसरीकडे जाईल, असे ते म्हणाले.’

First Published on: May 3, 2023 11:22 AM
Exit mobile version