पेणमध्ये पुराच्या पाण्यात गणेशमूर्तींचे नुकसान

पेणमध्ये पुराच्या पाण्यात गणेशमूर्तींचे नुकसान

पेणमध्ये पुराच्या पाण्यात गणेशमूर्तींचे नुकसान

अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठीकाणी पुरजनक स्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने खाडी किनारी असणाऱ्या हमरापूर, जोहे, दादर, करावे गावातील गणपती कारखान्यांतून पाणी शिरल्याने ४० हून अधिक कारखाने बाधित झाले आहेत. यामध्ये तयार होत असलेल्या गणेशमूर्ती पाण्याखाली जाऊन ४० ते ५० लाखाचे नुकसान झाल्याची माहिती गणपती कारखानदार संघटनेचे अध्यक्ष नितीन मोकल यांनी दिली आहे. दोन दिवस पडत असलेल्या पावसाने ऐन लगबगीच्या वेळी पावसाचे पाणी कारखान्यात शिरल्याने मूर्तीकार हवालदिल झाले आहेत. शहर आणि परिसरातील नदी किनाऱ्याच्या  गणेशमूर्ती कार्यशाळांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे अपरिमित नुकसान झाले आहे. तालुक्यातून हजारो गणेशमूर्ती महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आणि परदेशात नेल्या जात असल्यामुळे घेतलेली ऑर्डर वेळेत कशी पुरी करायची, अशी चिंता मूर्तिकारांना भेडसावत आहे. अनेक कारखान्यांतून मूर्ती तयार करण्याचे साहित्य आणि रबराचे साचे वाहून गेले आहेत.

६० टक्के मूर्तींची ऑर्डर पूर्ण होऊन त्या महाराष्ट्रासह देश आणि परदेशात पाठविण्यात आल्या असून, ४० टक्के मूर्ती अजून देणे बाकी आहे. परंतु पुरामुळे कारखान्यात चार ते पाच फुटापर्यंत पाणी गेल्यामुळे मूर्तींचे ९० टक्के नुकसान झाल्यामुळे उर्वरित ऑर्डरची समस्या उभी ठाकल्याचे मोकल यांनी सांगितले. कोरोनाच्या सावटामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक निर्बंध लागू होती. त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले होते. याच पार्श्वभूमीवर अनेक सण साजरे करण्यावरही शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे अनेक उद्योगांसह गणेशमूर्ती कलाकारांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यात आता अतिवृष्टीमुळे दुष्काळात तेरावा महिना, अशी परिस्थिती मुर्तिकारांवर आली आहे. नुकसानग्रस्त मूर्तीकारांना शासनाने तातडीने आर्थिक मदतीचा हात देण्याची मागणी त्यांनी केली आहे.


हेही वाचा – राज्यात आपत्कालीन मदतकार्यासाठी सैन्यदलांची मदत, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

First Published on: July 23, 2021 8:57 PM
Exit mobile version