अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

अलिबाग: अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकवला आहे. निवडणूकीत उतरलेल्या शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांचा धुव्वा उडवला. निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी शेतकरी भवन येथे एकच जल्लोष साजरा केला. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.
अलिबागमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १४९३ पैकी १३२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. टक्केवारीनुसार ८८ टक्के मतदान झाले. दरम्यान, महाविकास आघाडीने आपले बहुसंख्य उमेदवार बिनविरोध निवडून आणून यापूर्वीच वर्यस्व मिळवले आहे. मात्र, काही जागांवर शिंदे गट आणि भाजपने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्यानेचा सोपस्कार पार पाडत आहे.
कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे सलीम तांडेल, अनंत पाटील, संजय पाटील, स्वप्निल पाटील, यशवंत भगत, अशोक म्हात्रे, कमळाकर साखळे हे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तर शिंदे गटाच्या नंदन पाटील आणि संदेश थळे यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. व्यापारी आणि अडत्यांचा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिक पाटील तसेच सुभाष वागळे यांनी विजय मिळवत शिंदे गटाचे संजय भावे यांचा पराभव केला.

१८ जागांपैकी ७ बिनविरोध
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ जागांपैकी ७ बिनविरोध तर ११ जागांसाठी १६ उमेदवार रिंगणात आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात ११ जागांसाठी १३, ग्रामपंचायती मतदारसंघात ४ जागांसाठी ६, व्यापारी/आडते मतदारसंघात २ जागांसाठी ३ तर हमाल/मापारी मतदार संघात महाविकास आघाडीचा बिनविरोध उमेदवार निवडून आला आहे. शनिवारी मतमोजणीत ग्रामपंचायत मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भोपी यांना ५३८ तर भगत यांना ५१८ मते मिळाली. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी आणि शैलेश पाटील यांचा महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी दारुण पराभव करीत धुव्वा उडवला.

First Published on: April 29, 2023 9:10 PM
Exit mobile version