मुरूडमध्ये हापूस आंब्याचे दर गडगडले; २०० ते ३०० रुपये डझन

मुरूडमध्ये हापूस आंब्याचे दर गडगडले; २०० ते ३०० रुपये डझन

उदय खोत / नांदगाव
मे महिन्याच्या अखेरच्या कालावधीत मुरूडच्या मुख्य मार्केटमध्ये हापूस सहित वेगवेगळ्या जातीचे आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले असून दर देखील गडगडले आहेत.त्यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणावर आंबे खरेदीसाठी झुंबड उडत आहे.आश्चर्य म्हणजे मुरुड शहरात अजूनही काही ठिकाणी आंबा उतरवलेला दिसून येत नाही.मुरूड मार्केट मध्ये मात्र खारआंबोली, शिघ्रे, तेलवडे, खोकरी, माझेरी, विहूर, मुरूड, नागशेत भागातून विक्रीस येत आहेत. मार्केट परिसर आंबामय झालेला दिसून येत आहे.राजापुरी जातीचा कच्चा मोठा आंबा सोमवारी सायंकाळी १०० रुपये डझन या भावाने विक्री होताना दिसून आला. मार्केटमध्ये ९० टक्के आंबा मुबलक प्रमाणात आला असून स्थानिक परिसरातील आहे.
मुरूड मार्केट परिसरात तयार हापूस आंब्याचा डझनाचा दर २०० ते ३०० रुपये इतका खाली आल्याचे परिसरात फिरताना दिसून आले. त्यामुळे सामान्यजनांना देखील रसभरीत हापूस खरेदी करणे आवाक्यात आलेले दिसत आहे. केवळ हापुसच नाही तर, पायरी, तोतापुरी, रायवळ, लोणची आदी जातीचे आंबे देखील मोठ्या प्रमाणावर महिला विक्रीस आणताना दिसत आहे.आदिवासी महिलांचा सहभाग मोठा दिसत आहे. स्थानिक आंबा मोठ्या प्रमाणावर आल्याने वाशी मार्केटमधील आंब्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.आलेले पर्यटक देखील हापूस खरेदी करून मुंबई, पुण्यात घेऊन जाताना दिसून येत आहेत. मुरूडपासून ७ किमी अंतरावरील खोकरी येथे इब्राहिम एद्रुस हे घाऊक आणि किरकोळ आंबा विक्रेते असून यांच्याकडील उत्तम प्रतीचे आंबा खरेदीसाठी अनेक पर्यटक आणि स्थानिक नागरिक आवर्जून जात आहेत.
महत्त्वाचे म्हणजे अनेक अनुभवी आंबा प्रेमींचा कल तयार हापूस आंबे खरेदी करण्याकडे दिसत असून पेटी पॅक आंबे खरेदी देखील चोखंदळपणे ग्राहक खरेदी करताना दिसत आहेत. टोपलीतून विक्रीस येणार्‍या छोट्या आंब्याची विक्री देखील मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे.
बॉक्स…
दर १५० रुपये पर्यंतखाली येण्याची शक्यता
मार्च महिन्यात हापूस आंबे मार्केटला आलेले नव्हते. वाशी मार्केट मधील आंब्यांचा दर देखील परवडणारा नव्हता. त्यावेळी मुरूड मार्केटमधील निलेश कोळवनकर आणि सुभाष कासेकर या दोन भाजी विक्रेत्यांनी स्थानिक परिसरातले आंबे मे महिन्यात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतील असा अंदाज व्यक्त कला होता, तो अंदाज आता खरे ठरल्याचे दिसून आले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अजून मोठ्या प्रमाणात आंबे येतील आणि भाव देखील १५० रुपये पर्यंत खाली येण्याची शक्यता व्यक्त होत असून असे संकेत अनुभवी व्यापारी मंडळींनी मंगळवारी बोलताना दिले.

First Published on: May 23, 2023 9:14 PM
Exit mobile version