म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय गैससोय

म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय गैससोय

येथील ग्रामीण रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने उपचारासाठी येणार्या रुग्णांची कमालीची गैरसोय होत आहे. ३० खाटांची क्षमता असलेली या रुग्णालयाची भव्य इमारत विद्यमान खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने दोन कोटी रुपये खर्च करून २०१४ मध्ये उभारण्यात आली. रुग्णालय कार्यान्वित होऊन ७ वर्षे झाली तरी येथे आवश्यक असणारे वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, कर्मचारी आणि यंत्रसामग्री याकडे दुर्लक्ष झाले आहे. या रुग्णालयाचा उपयोग शहरातील रुग्णांनाच नव्हे तर तालुक्यातील ८० गाव, वाडीवस्तीतील रुग्णांना होत आहे. परंतु शासनाच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रुग्णालयाची अवस्था ’बडा घर पोकळ वासा’ अशी झाली आहे.

ग्रामीण रुग्णालयात उपचाराची परवड असल्याने रुग्णांना अनेकदा खासगी दवाखान्याची वाट धरावी लागते. गोरगरिबांना यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. खासदार तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांनी या रुग्णालयाला अनेक वेळा भेटी देऊन समस्या निवारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची पाठ फिरली आणि काही कालावधी निघून गेला की रुग्णालयातील कामकाज पुन्हा जैसे थे होते. नियुक्त करण्यात आलेला वैद्यकीय अधिकारी अन्य दवाखान्यात काम करतो आणि पगाराची पावती ग्रामीण रुग्णालयाच्या नावावर खपवली जात असल्याकडे यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

पालकमंत्री तटकरे यांनी काही महिन्यांपूर्वी स्थानिक डॉ. करंबे दाम्पत्याची बदलीवर नियुक्ती करून मोठा दिलासा दिला. त्यामुळे रोजची ओपीडी सेवा ५० ते १०० पर्यंत आहे. त्याचबरोबर काही प्रशिक्षित परिचारिकांची नेमणूक केल्याने बाळंतपणासाठी येणार्या महिलांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने गंभीर आजार असलेल्या रुग्णावर किंवा अपघातातील गंभीर जखमीवर उपचार होत नाहीत. दोन महिन्यांपासून डॉ. तांबे यांची रुग्णालयात नियुक्ती करण्यात आली. मात्र ते वैद्यकीय सेवा कुठे देत आहेत, हे समजत नसून, त्यांचा मासिक पगार ग्रामीण रुग्णालयाचे नावाने काढला जात असल्याचे समजले.

दरम्यान, तंत्रज्ञ नसल्याने एक्सरे मशिनही धूळ खात आहे. ईसीजी मशिन, डीप फ्रीज, रक्त तपासणीची आधुनिक यंत्रणा, वॉशिंग मशिन, सोनोग्राफी यंत्र आदींची रुग्णालयासाठी नितांत गरज आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय अधिक्षकासह, एक वैद्यकीय अधिकारी, ५ परिचारिका, २ सफाई कामगार, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, सुरक्षा रक्षक, ३ कक्ष सेवक, दंत शल्यचिकित्सक आणि क्ष किरण तंत्रज्ञ या जागा रिक्त आहेत. सध्या रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार श्रीवर्धन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढवळे यांच्याकडे सोपविण्यात आला तरी त्यांना या रुग्णालयात सेवा देण्यास वेळच मिळत नसल्याने आरोग्य सेवा दुर्लक्षित झाली आहे. त्यातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयातील गैरसोय अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहेत.

हेही वाचा –

corona vaccination : अमेरिकेत प्रौढांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेला वेग

First Published on: April 20, 2021 3:53 PM
Exit mobile version