साथीच्या आजाराने रायगडकर त्रस्त, वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम

साथीच्या आजाराने रायगडकर त्रस्त, वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम

गेल्या काही महिन्यांपासून बदलत्या वातावरणामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास जाणवू लागला आहे. हवामानात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे साथीचे आजार पसरत आहेत. परिणामी ताप, थंडी, सर्दी, कोरडा खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचा जिल्ह्यातील रुग्णांना विळखा बसला आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत ताप, सर्दी, कोरड्या खोकल्याचे शेकडो रुग्ण दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांत अशा साथीच्या आजारांनी त्रस्त असलेले अनेक रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. उपचार करून घेण्यासाठी रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू झालेला ऊन व थंडीचा खेळ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणारा ठरला आहे.

दोन-चार दिवस जुजबी औषधांनी अंगावर काढल्यानंतर तापाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात येत आहे. शरीरातील पांढर्‍या पेशींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. दाखल झालेल्या बहुतांशी रुग्णांत मलेरिया, डेंग्यू यांचेही रुग्ण असल्याने रक्त तपासणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. खासगी रक्त तपासणी केंद्रांवर त्यामुळे रुग्णांची रक्त तपासणी नमुने देण्यास एकच गर्दी होत आहे.

साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात मलेरियाचे असंख्य रुग्ण आहेत. रुग्णांनी रक्त तपासणी करून घेणे गरजेचे आहे. अतिसार, उलटी, श्वसनाचा त्रास, खोकला, ताप, घसा दुखणे ही लक्षणे आढळताच सार्वजनिक ठिकाणी जाणे रुग्णांनी टाळावे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक सकाळी वाढणारे तापमान, तर काही वेळानंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी असलेले २५ ते ३० रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येते आहेत.
– डॉ. राजीव तांभाळे, वैद्यकीय अधिकारी.

First Published on: January 28, 2022 8:46 PM
Exit mobile version