अंगारकी चतुर्थीनिमित्ताने महडसह रायगडमध्ये श्रींच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ

अंगारकी चतुर्थीनिमित्ताने महडसह रायगडमध्ये श्रींच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ

खोपोली: खालापूर तालुक्यातील अष्टविनायकापैकी असेलेले महड येथील श्री वरद विनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्तांची मांदियाळी होती. श्री वरद विनायकाचरणी भाविक भक्त लिन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.वातावरणात थंडीचे प्रमाण वाढत असले तरी त्याची तमा न बाळगता सोमवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून भाविकांनी महडमध्ये दाखल होत श्रींचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली. तर वर्षातून दोनच अंगारक चतुर्थी येत असतात, मात्र या वर्षी नविन वर्षात अंगारकी चतुर्थी एकच असल्याने ती ही नवीन वर्षाची सुरुवातीला आल्याने वरद विनायक गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी भक्त गणांनी मोठी गर्दी करीत देवावरील श्रध्दा आणि भाक्तिभावाचेे दर्शन घडविले. यावेळी मंदिराच्या बाहेर भाविकांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या.
मुंबई -पुणे महामार्गावर हे अष्टविनायका पैकी असेलेले महड गावातील वरद विनायक यांचे दर्शन घेण्यासाठी खालापूर, चौक, खोपोली ,कर्जत, पनवेल, रसायनी या परिसरासह जिल्हा तसेच मुंबई ाणि विविध ठिकाणांहून भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विशेष करून दर अंगारकी चतुर्थीला पिण्याच्या पाण्याची तसेच मंडप आणी भक्तगणांसाठी वाहनांची व्यवस्था वरद विनायक संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, महड संस्थांच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्याकडूनही येथील अन्य व्यवस्था, पोलीस बंदोबस्त याचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत होता. तर खालापूर पोलिसांकडून विशेष पोलीस पथक संपूर्ण दिवस तैनात करण्यात आले होते. हौशी भक्तांंनी मदत सभामंडपातील काढलेली फुलांची आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
महडचा गणपती म्हणजे आपली इच्छा पूर्ती करणारा अशी ख्याती आहे, म्हणून दर महिन्यात येणार्‍या संकष्टी चतुर्थी तसेच अंगारकी चतुर्थी यावेळी असंख्य भक्तगण वरद विनायकाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. श्री वरद विनायक गणपतीचे दर्शन घेतल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होत असल्याची श्रध्दा भाविकांची असल्याने राज्यातील सर्व भागातील गणेश भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. विशेष करुन संकष्टी आणि अंगारक चतुर्थीला तालुक्यासह जिल्ह्यातील भक्त गण या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.

चिरनेरमध्ये भाविकांची गर्दी
असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र चिरनेर (ता. उरण) येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्ताने असंख्य भाविकांनी उपस्थिती दर्शवत श्री महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. स्वयंभू, नवसाला पावणारा, संकट हरण करणारा आणि संकटमोचक अशा प्रकारची श्रध्दा श्रीक्षेत्र चिरनेर महागणपतीबाबत भाविकांच्या मनात असून दर संकष्टी चतुर्थीला पनवेल, उरणसह नवी मुंबई परिसरातून हजारो भाविक नियमित श्रींच्या दर्शनाला येत असतात. मंगळवारी अंगारकी चतुर्थी असल्याने सकाळपासूनच भाविकांची रिघ लागली होती. काही भक्त पायी चालत येत श्रींवरील आपला श्रध्दाभाव व्यक्त करीत असून चतुर्थी, अंगारकी तसेच माघ शुध्द चतुर्थी श्रीगणेश चतुर्थी तथा माघी गणेशोत्सव दिनीही पायी-दिंडीने येणार्‍या भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. पहाटे श्रींचा अभिषेक, पूजन, आरती तसेच दिवसभर भजन, गायन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, येत्या २५ जानेवारीस माघी गणेशोत्सव असून श्रीक्षेत्र चिरनेर येथे सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होणार असून यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रंमी गर्दी होत असल्याचे दिसून येते.

मुरुडमध्ये भाविकांची गर्दी
मुरुड: गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाची असणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंगळवारी शहर तसेच ग्रामीण भागातील गणेश मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेण्याकरिता सकाळ पासूनच गर्दी पाहावयास मिळाली. अंगारकी संकष्टी या नव्या वर्षातील पहिली संकष्टी. या दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना भाविकांची असल्याचे मत एका श्री भक्ताने व्यक्त केले.

First Published on: January 10, 2023 10:37 PM
Exit mobile version