गृहप्रकल्पासाठी रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम

गृहप्रकल्पासाठी रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम

नेरळ-कळंब रस्त्यावर सुरू असलेल्या एक्झर्बिया या खासगी गृहसंकुलाच्या बेकायदा भूमिगत विद्युत वाहिनीचे काम पोशीरच्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बंद पाडले आहे. रस्त्याची साईडपट्टी खोदून 22 केव्ही इतक्या तीव्र क्षमतेची विद्युत वहिनी टाकण्याचे काम सुरू असून, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील हा राज्य महामार्ग असून, त्याचे खोदकाम बेकायदा असल्याचा आरोप गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय राणे यांनी करून काम थांबविण्यास सांगितले आहे. शिवाय बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता चौधरी यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले होते. त्यांनी ठेकेदाराकडे परवानगीची कागदपत्रे मागितली असता ती देता आली नाहीत. त्यामुळे हे खोदकाम तातडीनं थांबवण्याचे निर्देश चौधरी यांनी दिले. ठेकेदाराने काम थांबविले असले तरी उकरून ठेवलेली माती रस्त्यावरच टाकण्यात आल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच ही विद्युत वहिनी काही ठिकाणी 2 फूट तर काही ठिकाणी 4 फूट खोल टाकण्यात आल्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा हे काम सुरू केल्यास शेतकरी आणि गावकर्‍यांनी तीव्र आंदोलन छेडून काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे.

एक्झर्बियाच्या ठेकेदाराकडे भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याची कोणतीही परवानगी नाही. तरीही खोदकाम सुरू आहे. साईडपट्टीमुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे हे काम बंद पाडण्यात आले आहे. पुन्हा काम सुरू केल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल.
-दत्तात्रेय राणे, सदस्य, पोशीर ग्रामपंचायत

First Published on: February 13, 2021 4:25 PM
Exit mobile version