कर्जत राजनाल्याचे पाणी उपकालव्यांपासून दूरच

कर्जत राजनाल्याचे पाणी उपकालव्यांपासून दूरच

कर्जत तालुक्यातील दुबार भात शेतीसाठी राजनाला कालव्यातून दरवर्षी प्रमाणे 15 डिसेंबरला पाणी सोडण्यात येते. मात्र राजनाला कालव्याच्या उपकालव्यांचे काम तंत्रशुद्ध पद्धतीने न झाल्याने हे पाणी सर्व गावांना योग्य प्रमाणात पोहोचत नसल्याने लाडिवली गेट क्रमांक 18 ला पाणीच आले नाही. परिणामी परिसरातील शेतकर्‍यांना दुबार भात शेती, मळे, बागायती करता आली नसून, नाल्याला पाणी आले नसल्याने या भागातील पाणी पातळी खालावल्याने विहीर, कूपनलिकांचे पाणी आटत चालले आहे. याचीच दखल घेत भाजपचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी या कोरड्या राजनाल्यात बसून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात पाटबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, मंदार मेहेंदळे, नवीन देशमुख, किरण घाग आदी उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे राजनाल्याला 15 डिसेंबरला पाणी सोडण्यात आले. मात्र लाडिवली परिसरात अजून पोहोचले नाही. आता 1 मे रोजी पाणी बंद करण्यात येईल. शेतकरी पीक कधी घेणार, हा प्रश्नच आहे. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाठपुरावा करूनही दखल घेत नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबविण्याची वेळ आली आहे.
– बळवंत घुमरे, नगरसेवक, कर्जत

फार पूर्वी बांधण्यात आलेला राजनाल्याचे बांधकाम मातीत होते. मात्र तरीसुद्धा शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचून सर्व क्षेत्र ओलिताखाली येत होते. मात्र ७-८ वर्षांपूर्वी तब्बल 70 कोटी पेक्षा अधिक निधी खर्च करून या राजनाल्याचे बांधकाम सिमेंट क्राँक्रिटमध्ये करण्यात आले. मात्र काम तंत्रशुद्ध पद्धतीने केले नसल्याने काही भागात मुख्य नाला खाली तर त्याला जोडणारे उपनाले तथा कालवे वर बांधल्या गेले. तसेच नाल्याची दुरुस्ती, साफसफाई वेळेवर केली जात नसल्यानेही पाणी वाहण्यास अडथळा होतो.

नाले दुरुस्ती करून दोन ते तीन दिवसात पाणी पोहोचण्याची व्यवस्था करू.
– सुरेश सोनावळे, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग, कर्जत

राजनाला डाव्या कालव्याचे सिंचन 1959 पासून सुरू आहे. तर राजनला उजवा कालवा आणि पाली पोटल कालव्याचे काम 1972-73 ला पूर्ण झाले, तर 1974 मध्ये यामधूनही सिंचनास सुरुवात झाली. राजनाला डाव्या कालव्याची लांबी 21 किलोमीटर आहे. यामध्ये 35 गावे समाविष्ट असून, सिंचन क्षेत्र 1800 हेक्टर, तर राजनाला उजवा कालव्याची लांबी 7.70 किलोमीटर असून, 4 गावे सामाविष्ट आहेत. सिंचन क्षेत्र 400 हेक्टर आहे. पाली पोटल 9.80 किलोमीटर असून, 6 गावांचा समावेश, तर सिंचन क्षेत्र 342 हेक्टर इतके आहे.

हेही वाचा –

गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक

First Published on: April 21, 2021 4:18 PM
Exit mobile version