दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही – रामदास आठवले

दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही – रामदास आठवले

दि.बा सर्वांचे बाप होते. त्यांनी सर्व महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दात नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली. कोल्ही कोपर येथे नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. ठाकरे सरकारला भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी, अशा शब्दात घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडिलांच्या नावाचा विचार न करता वडीलधारी दिबांचे नाव देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही केले.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून दिबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी भूमिपुत्रांची ’भूमिपुत्र परिषद’ आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दशरथ भगत, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, राजाराम पाटील, जे. डी. तांडेल,उपस्थित होते.

आठवले यांनी सांगितले कि, दिबांचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राहिला आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारला घेणे भाग पडले आहे. दिबा संघर्षशील नेते होते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गौरवशाली कार्य केले आहे. समाजाला न्याय देण्याचा संघर्ष सर्वानी पाहिला आहे. त्यामुळे वाटेल ते झाले तरी चालेल पण विमानतळाला दिबांचेच नाव लागलं पाहिजे असे सांगतानाच त्यांच्या नावासाठी आरपीआयचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रामशेठ ठाकूर आणि मी मित्र आहे. ते एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. संघर्ष करून ते पुढे आले. दिबांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करणारा माणूस म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. दिबांनी सर्वांसाठी संघर्ष केला. भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून ते जेलमध्येही गेले आहेत. सिडकोने जमिनी घेतल्या पण मात्र प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाचा विचार सिडकोने केला नाही. गावांचे योग्य पुनर्वसन, बांधकाम परवानगी, रोजगार, नोकरी, असे अनेक प्रश्न आहेत ते सिडको आणि राज्य सरकार सोडवू शकतात. ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले. यावेळी रामदास आठवले यांनी दिबांच्या वर कविता सादर करत त्यांना आदरांजली वाहिली. तसेच भीमशक्ती दिबाशक्ती मध्ये एकवटली असल्याचे यावेळी अधोरेखित केले. यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार जगन्नाथ पाटील, कॉम्रेड भूषण पाटील, दशरथ भगत, रुपेश धुमाळ, गुलाब वझे, संतोष केणे, जयेश आक्रे, प्रेमपाटील, यांचीही भाषणे झाली.

कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपुत्रांच्या दृष्टिकोनातून यावेळी दोन ठराव जाहीर केले. काहीही झाले तरी दिबांच्या १०० व्या जयंतीपूर्वी दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे. तसेच सिडको संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे, बहुजनांचे प्रश्न सुटलेनाही तर २४ जानेवारीला विमानतळाचे काम करून द्यायचे नाही असे दोन ठराव त्यांनी जाहीर करताच सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

First Published on: January 14, 2022 7:38 PM
Exit mobile version