रायगड जिल्ह्याच्या काँग्रेस अध्यक्षपदी कोण?

रायगड जिल्ह्याच्या काँग्रेस अध्यक्षपदी कोण?

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांची पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागताच जिल्हा काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण, याची चर्चा सुरू झाली असून, कामगार नेते महेंद्र घरत, विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर आणि रोहे तालुकाध्यक्ष निजाम सय्यद यांची नावे त्यासाठी पुढे आली आहेत. एकेकाळी जिल्ह्यात भक्कम जनाधार असलेल्या काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे वजनदार नेते, कार्यकर्ते काँग्रेसपासून दूर गेल्याने पक्षाची अवस्था अधिकच बिकट झाली. अलिकडे पनवेल महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याची धुरा माजी आमदार असलेल्या जगताप यांच्या खांद्यावर देण्यात आली खरी, पण त्यांना राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या झंझावातापुढे फारसा प्रभाव दाखवता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वतःला पराभवाला सामोरे जावे लागले तर पेणमध्ये पक्षाच्या उमेदवाराला अनामत रक्कमही वाचवता आली नाही. पक्षाची अशी ही वाताहात एकनिष्ठ कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले यांच्यासारखा आक्रमक चेहरा आल्याने कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण आहे. त्यातच जगताप यांनाही पक्षाने ‘प्रमोशन’ देऊ कले आहे. आता त्यांच्या जागी अध्यक्षपदी कोण येणार याची चर्चा अपेक्षेप्रमाणे सुरू झाली असून, जिल्ह्यातील विरोधकांना अंगावर घेणारा नेता त्या पदावर यावा, अशी अपेक्षा कार्यकर्ते करीत आहेत. उरणचे घरत हे कामगार नेते असून, धडाकेबाज स्वभाव अशी त्यांची ओळख आहे. संघटन कौशल्य ही त्यांची भक्कम बाजू मानली जाते. ते या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जातात. अ‍ॅड. ठाकूर हे सक्रिय नेते असून, माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ते पुत्र आहेत. एकेकाळी पक्षाची व्होट बँक असलेल्या अल्पसंख्यांकांची बरीचशी मते अलिकडे अन्य पक्षांकडे वळू लागल्याने ती रोखण्यासाठी सय्यद यांचे नाव पुढे येऊ शकते. बेधडक व्यक्तिमत्त्व, रोखठोक बोलणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

खोपोलीचे बेबी सॅम्युअल, कर्जतचे पुंडलिक पाटील, विजय मिरकुटे अशी नावेही पक्षासमोर असू शकतात. मात्र त्यांच्या वयोमानाचा विचार करून ही संधी त्यांना मिळणे संभवत नाही. रोहे, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळे या तालुक्यांतून काँग्रेसची मोठी पडझड झाल्याने अध्यक्षपद रोह्याकडे असावे असा पक्षातील तरुण नेत्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची लॉटरी सय्यद यांना लागली तर घरत, अ‍ॅड. ठाकूर यांना प्रदेश समिती किंवा महत्त्वाच्या शासकीय समित्यांवर पद दिले जाऊ शकते, अशी शक्यता एका वरिष्ठ नेत्याने नाव छापण्याच्या अटीवर बोलून दाखवली. दुसरीकडे धक्का तंत्र वापरणे हा काँग्रेसचा स्थायी भाव असल्याने ऐनवेळी ‘सर्वमान्य’ अनपेक्षित नाव पुढे येऊ शकते, अशीही चर्चा आहे.

हेही वाचा –

कंटेनरच्या भाड्यात वाढ, द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

First Published on: February 8, 2021 3:28 PM
Exit mobile version