European Super League : बार्सिलोना, चेल्सीसह युरोपातील १२ संघांची मिळून ‘सुपर लीग’

European Super League : बार्सिलोना, चेल्सीसह युरोपातील १२ संघांची मिळून ‘सुपर लीग’

युरोपियन सुपर लीग

युरोपातील १२ सर्वात बलाढ्य आणि लोकप्रिय फुटबॉल संघांनी मिळून ‘युरोपियन सुपर लीग’ स्पर्धेची घोषणा केली. तसेच या स्पर्धेत एकूण २० संघ खेळणार असल्याचे युरोपियन सुपर लीगकडून सांगण्यात आले. मात्र, केवळ आर्थिक फायद्यासाठी ही स्पर्धा तयार करण्यात आल्याचे मत व्यक्त करून फिफा आणि युएफा या फुटबॉल महासंघांसह जगभरातील फुटबॉल चाहते व माजी फुटबॉलपटूंनी या स्पर्धेला विरोध दर्शवला आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांवर त्यांच्या स्थानिक स्पर्धांमध्ये खेळण्यावर, तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्यावर बंदी घालण्याची ताकीद फिफा आणि युएफाने दिली आहे. तसेच हे आघाडीचे संघ केवळ स्वतःचा आर्थिक फायदा बघत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

चेल्सी, लिव्हरपूल, मँचेस्टर युनायटेड, मँचेस्टर सिटी, आर्सनल आणि टॉटनहॅम या इंग्लिश प्रीमियर लीगमधील सहा संघांसह रियाल माद्रिद, बार्सिलोना आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद या स्पॅनिश संघांनी, तसेच ज्युव्हेंटस, इंटर मिलान आणि एसी मिलान या इटालियन संघांनी मिळून ‘सुपर लीग’ची स्थापना केली आहे.

ही स्पर्धा मंगळवार किंवा बुधवारी खेळवली जाईल आणि हे संघ आपल्या स्थानिक स्पर्धांमध्ये खेळत राहतील, असे सांगण्यात आले. तसेच या १२ संघांसह आणखी तीन संघ हे या स्पर्धेचे प्रमुख सदस्य असतील आणि आणखी पाच संघ हे विविध स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. फिफा आणि युएफाने मात्र या स्पर्धेचा प्रस्ताव फेटाळला आहे.

First Published on: April 19, 2021 11:00 PM
Exit mobile version