२०११ वर्ल्डकप स्पर्धेतील अपयशानंतर मिळालेली जीवे मारण्याची धमकी; दक्षिण आफ्रिकन खेळाडूचा खुलासा 

२०११ वर्ल्डकप स्पर्धेतील अपयशानंतर मिळालेली जीवे मारण्याची धमकी; दक्षिण आफ्रिकन खेळाडूचा खुलासा 

एबी डिव्हिलियर्स आणि फॅफ डू प्लेसिस 

दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चोकर्स म्हणून संबोधले जाते. या संघात काही वर्षांपूर्वीपर्यंत ग्रॅमी स्मिथ, एबी डिव्हिलियर्स, जॅक्स कॅलिस, डेल स्टेन, हाशिम आमला आणि फॅफ डू प्लेसिस यांसारख्या महान खेळाडूंचा समावेश होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेला एकदाही एकदिवसीय किंवा टी-२० वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. बहुतांश वेळा या संघाला महत्वाच्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश येते. २०११ वर्ल्डकपमध्येही दक्षिण आफ्रिकेला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, उपांत्यपूर्व फेरीत त्यांना न्यूझीलंडने पराभूत केल्याने त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. या सामन्यात डू प्लेसिस आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यात ताळमेळची गडबड झाल्याने एबी धावचीत झाला होता. त्यातच दक्षिण आफ्रिकेने हा सामनाही गमावल्याने डू प्लेसिसला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

आम्हाला धक्काच बसला

२०११ वर्ल्डकपचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकण्यात आम्हाला अपयश आले. त्या सामन्यानंतर मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आम्ही आमचे सोशल मीडिया अकाऊंट उघडून बघितले आणि त्यावर लोक जे काही बोलत होते, ते पाहून आम्हाला धक्काच बसला. आमच्याबाबत काही फारच चुकीच्या गोष्टी बोलल्या जात होत्या, ज्या मी आता सांगूही शकत नाही, असे डू प्लेसिस एका मुलाखतीत म्हणाला.

कमी लोकांना आम्ही जवळचे मानतो

यासारख्या घटनांनंतर तुम्ही लोकांशी संवाद साधणे टाळता. तुम्ही स्वतःभोवती एक भिंत तयार करता. प्रत्येकच खेळाडूला यातून जावे लागते. त्यामुळे आम्ही फार कमी लोकांना आमच्या जवळचे मानतो, असे डू प्लेसिसने सांगितले. उपांत्यपूर्व फेरीच्या त्या सामन्यात न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २२१ धावाच करता आल्या होत्या. परंतु, दक्षिण आफ्रिकेचा डाव १७२ धावांत आटोपल्याने न्यूझीलंडने तो सामना ४९ धावांनी जिंकला होता.

First Published on: May 18, 2021 10:09 PM
Exit mobile version