हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा : दुहेरीत रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विजयी

हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा : दुहेरीत रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विजयी

सौजन्य - ऑल इंडिया रेडिओ स्पोर्ट्स

हैदराबादमध्ये हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूनी वर्चस्व प्रस्थापित केले असून पुरूष एकेरीत समीर वर्माच्या विजयानंतर दुहेरीत सात्विकराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने विजय मिळवत भारताला आणखी एक यश मिळवून दिले आहे. भारताच्या या जोडीने इंडोनेशियाच्या अकबर बिन्तांग काहेयोनो आणि मोहरेझा पहलवी इस्फाहानी यांना २१-१६ आणि २१-१४ असा सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय आपल्या नावे केला आहे.


असा झाला सामना

सामन्यात सुरूवातीपासूनच सात्विक आणि चिराग यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर आपला दबदबा ठेवला. पहिला सेट २१-१६ च्या फरकाने जिंकत भारतीय जोडीने सामन्यात १-० ची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा २१-१४ च्या फरकाने विजय मिळवत भारतीय जोडीने सामना आपल्या नावे केला. इंडोनेशियाच्या अकबर आणि मोहरेझा यांना सामन्यात अखेर पर्यंत वर्चस्व प्रस्थापित करण्यात अपयश आलं.

वाचा – हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धा : भारताचा समीर वर्मा विजयी

भारताच्या सात्विकराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला ४ लाख रूपये बक्षिस मिळाले असून उपविजेत्या इंडोनेशियाच्या अकबर बिन्तांग काहेयोनो आणि मोहरेझा पहलवी इस्फाहानी या जोडीला दोन लाखाचे बक्षिस देण्यात आले आहे. तर दुसरीकडे भारताच्या समीर वर्माने अंतिम सामन्यात मलेशियाच्या सूंग जू वेनला २१-१५, २१-१८ अशा दोन सरळ सेट्समध्ये नमवत सामन्यात विजय मिळवला आहे. भारताच्या हैदराबाद ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील या विजयाने भारताच्या बॅडमिंटन चाहत्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

First Published on: September 10, 2018 1:42 PM
Exit mobile version