भारताचे ५२४ खेळाडू आशियाई खेळांसाठी रवाना 

भारताचे ५२४ खेळाडू आशियाई खेळांसाठी रवाना 

आशियाई खेळ, २०१८

सध्या सगळीकडे खेळांचे वातावरण असून फिफाचा २१ वा विश्वचषक रशियात सुरू आहे. तर लंडनमध्ये २०१८ विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही सुरू आहे. त्यासोबतच भारताचा इंग्लंड दौरादेखील सुरू आहे. या सर्वात आता आणखी भर पडणार आशियाई खेळांची. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान इंडोनेशियात ही स्पर्धा पार पडणार आहे. भारतही या स्पर्धेत सामील होणार असून भारताकडून ५२४ खेळाडूंचे पथक या स्पर्धेसाठी रवाना होणार असल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली. मात्र खेदाची बाब ही आहे की भारतीय महिला आणि पुरुष फुटबॉल संघाला मात्र ऑलिम्पिक संघटनेने या स्पर्धेत खेळण्याची मान्यता दिलेली नाही.
५२४ भारतीय खेळाडूंच्या पथकात २७७ पुरुष तर २४७ महिला खेळाडूंचा समावेश आहे. हे ५२४ खेळांडूंचे पथक ३६ वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत आपल्याला खेळताना दिसतील. महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षीच्या भारताकडून खेळायला जाणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत घट करण्यात आली आहे. २०१४ साली दक्षिण कोरियात पार पडलेल्या आशियाई खेळांसाठी भारताने ५४१ खेळाडूंचे पथक पाठवले होते.

फुटबॉल संघांला मात्र मान्यता नाही

भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून, आशियाई खेळांसाठी भारतीय पुरूष आणि महिला दोनही फुटबॉल संघाना परवानगी देण्यात आलेली नाहीये. आशियाई खेळांत सहभागी होण्यासाठी आशियाई देशांच्या रँकीगमध्ये ८ व्या स्थानावर असने गरजेचे असते. मात्र भारतीय पुरूष संघ सध्या १४ व्या तर भारतीय महिला संघ १३ व्या स्थानावर असल्याने त्यांना या स्पर्धेत खेळण्याची परवानगी मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वीच भारतीय फुटबॉल संघांने इंटरकॉन्टिनेंटल कप पटकावल्यानंतर देखील भारताला या स्पर्धेत खेळण्याची परवानगी न मिळाल्याने सर्व भारतीय फुटबॉल फॅन्समध्ये निराशाजनक वातावरण आहे.

भारतीय फुटबॉल संघ

आशियाई खेळ, २०१८

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ वे आशियाई खेळ पार पडणार आहेत. आशियातील ४५ देश या स्पर्धेत सामील होणार असून १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. आशियाई खेळांच्या इतिहासात पहिल्यादांच दोन शहरांमध्ये आशियाई खेळांचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत नेहमी असणाऱ्या क्रीडाप्रकारांसोबतच ८ नवीन क्रीडाप्रकारांचीही भर पडणार आहे. ज्यामध्ये कराटे, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस यांच्यासारख्या नवीन खेळांची भर पडताना आपल्याला दिसणार आहे.

First Published on: July 4, 2018 6:34 PM
Exit mobile version