दादाच्या संघापासून भारतीय क्रिकेटचे नवे पर्व सुरु झाले!

दादाच्या संघापासून भारतीय क्रिकेटचे नवे पर्व सुरु झाले!

कसोटीतील यशाबाबत कोहलीचे मत

सौरव गांगुलीच्या संघापासून भारतीय क्रिकेटपटूंच्या मानसिकतेत बदल झाल्यामुळेच आता भारताचा संघ इतका यशस्वी होत आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. तसेच त्या संघापासून भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि आम्ही मेहनत घेऊन त्यांची चांगली कामगिरी पुढे नेत आहोत, असे कोहलीने नमूद केले. भारतीय संघाने कोलकाता येथे झालेल्या दुसर्‍या कसोटीत बांगलादेशचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला. त्याआधी या मालिकेतील इंदूर येथे झालेला पहिला सामना भारताने एक डाव आणि १३० धावांनी जिंकला होता.

कसोटी क्रिकेट हे मानसिक झुंज असते. आम्ही कोणत्याही संघाला झुंज देण्यास तयार असतो आणि याची सुरुवात दादाच्या (गांगुली) संघापासून झाली. त्या संघापासून भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असे म्हणता येईल. तुम्ही कोणत्याही संघावर मात करू शकता हा विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे असते. आम्ही प्रामाणिकपणे खूप मेहनत घेत आहोत आणि त्याचेच आम्हाला फळ मिळत आहे, असे कोहली सामन्यानंतर म्हणाला.

इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या भारताच्या तेज त्रिकुटाने दुसर्‍या कसोटीत बांगलादेशच्या सर्व विकेट्स घेतल्या. भारताच्या फिरकीपटूंना एकही विकेट मिळवता आली नाही. या वेगवान गोलंदाजांविषयी कोहलीने सांगितले, आमच्या गोलंदाजांना कोणत्याही देशात, कोणत्याही खेळपट्टीवर विकेट्स मिळवण्याचा विश्वास आहे. आमचे फिरकीपटूही परदेशात विकेट्स मिळवण्याच्या उद्देशानेच गोलंदाजी करतात. आमचे गोलंदाज विकेट मिळवण्याची संधी शोधतात.

First Published on: November 25, 2019 5:48 AM
Exit mobile version