IPL 2020 : डिव्हिलियर्सची तुफानी खेळी; राजस्थानविरुद्ध RCB विजयी 

IPL 2020 : डिव्हिलियर्सची तुफानी खेळी; राजस्थानविरुद्ध RCB विजयी 

एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्सने केलेल्या अप्रतिम फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघावर ७ विकेट राखून विजय मिळवला. आरसीबी संघाने यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली असून हा त्यांचा नऊ सामन्यांत सहावा विजय होता. त्यामुळे त्यांच्या खात्यात सध्या १२ गुण आहेत. आरसीबीप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांचे १२ गुण आहेत. आजच्या सामन्यात राजस्थानने दिलेले १७८ धावांचे लक्ष्य आरसीबीने अखेरच्या षटकात गाठले. डिव्हिलियर्सने २२ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी केली.

स्टिव्ह स्मिथचे अर्धशतक

या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रॉबिन उथप्पाला यंदाच्या मोसमात पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचा फायदा घेत २२ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. बेन स्टोक्स (१५) आणि संजू सॅमसन (९) यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर मात्र कर्णधार स्मिथने चांगली फलंदाजी केली. त्याने ३६ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. तसेच त्याने राहुल तेवातियासोबत ४६ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद १७७ अशी धावसंख्या उभारली. आरसीबीकडून क्रिस मॉरिसने ४ विकेट घेतल्या.

एबीला गुरकीरतची साथ

१७८ धावांचा पाठलाग करताना आरसीबीच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. त्यांचा सलामीवीर फिंचला १४ धावांवर श्रेयस गोपाळने बाद केले. यानंतर सलामीवीर देवदत्त पडिक्कल (३५) आणि कर्णधार कोहली (४३) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, त्यांना वेगाने धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे अखेरच्या पाच षटकांत आरसीबीला जिंकण्यासाठी ६४ धावांची आवश्यकता होती. परंतु, डिव्हिलियर्सने २२ चेंडूत नाबाद ५५ धावांची खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. त्याच्या या खेळीत तब्बल ६ षटकारांचा समावेश होता. त्याला गुरकीरतने (नाबाद १९) चांगली साथ दिली.

First Published on: October 17, 2020 7:29 PM
Exit mobile version