IND vs AUS : रहाणेने अधिक जबाबदारी घ्यावी, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी! 

IND vs AUS : रहाणेने अधिक जबाबदारी घ्यावी, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी! 

अजिंक्य रहाणे

अ‍ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ विकेट राखून मात केली. या कसोटीच्या पहिल्या डावात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक केले होते. मात्र, आता कोहली पितृत्व रजेवर गेला असून उर्वरित तीन कसोटी सामन्यांत खेळणार नाही. त्याच्या जागी अजिंक्य रहाणे भारताचे कर्णधारपद भूषवणार आहे. त्यामुळे रहाणेने कर्णधार म्हणून अधिक जबाबदारी घेऊन चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला वाटते.

रहाणेने आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. तो नेहमी पाचव्या क्रमांकावर खेळतो. मात्र, त्याने कर्णधार म्हणून अधिक जबाबदारी घेऊन पाचव्याऐवजी चौथ्या क्रमांकावर खेळले पाहिजे. त्यानंतर त्याने पाचव्या क्रमांकावर लोकेश राहुलला खेळवले पाहिजे आणि रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर खेळला पाहिजे. माझ्या मते, दुसऱ्या कसोटीत भारताने पाच गोलंदाजांसह मैदानात उतरले पाहिजे. त्यामुळे रविंद्र जाडेजाला सातव्या क्रमांकावर खेळवून आठव्या क्रमांकावर अश्विनला खेळवण्याचा सल्ला मी रहाणेला देईन. त्यामुळे तीन वेगवान गोलंदाज संघात राहू शकतील, असे गंभीर एका मुलाखतीत म्हणाला.

तसेच २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत भारताने पृथ्वी शॉला वगळून शुभमन गिलला सलामीवीर म्हणून खेळवले पाहिजे, असेही गंभीरला वाटते. पहिल्या कसोटीत पृथ्वीला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा निर्णय योग्य होता. त्याने त्या सामन्याआधी चार कसोटीत एक शतक आणि दोन अर्धशतके केली होती. मात्र, त्याची पहिल्या कसोटीतील कामगिरी पाहता, आता त्याला वगळून शुभमन गिलला संधी देण्याची वेळ आली आहे.

First Published on: December 22, 2020 9:03 PM
Exit mobile version