अजित घोष स्मृती महिला क्रिकेट

अजित घोष स्मृती महिला क्रिकेट

स्पोर्टिंग युनियन क्लबने अजित घोष स्मृती महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेतील आपल्या दुसर्‍या साखळी लढतीत दहिसर क्रिकेट क्लबवर नऊ विकेटने मात केली, तर मुंबई पोलीस संघाने ग्लोरियस क्रिकेट क्लबचा ३४ धावांनी पराभव केला.

स्पोर्टिंग युनियन क्लबविरुद्धच्या सामन्यात दहिसर क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पोर्टिंग युनियनच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांना निर्धारित २० षटकांत ६ विकेट गमावत केवळ ६४ धावाच करता आल्या. स्नेहा रावराणे (१०) आणि रविता सिंघ (नाबाद १६) या दोघीच दुहेरी धावसंख्या गाठू शकल्या. स्पोर्टिंगच्या अक्षता साबळेने १० धावांत २ विकेट घेतल्या. ६५ धावांचे लक्ष्य स्पोर्टिंग युनियनने ५.४ षटकांतच पूर्ण केले. प्रियांका गोलीपकरने १७ चेंडूत १८, तर नाजूका दवणेने १४ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २७ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

दुसर्‍या सामन्यात मुंबई पोलीस संघाने ग्लोरियसविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १४६ धावा उभारल्या. सलामीवीर सारिका कोळीने ३० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. तिने आणि २८ धावा करणार्‍या मनश्री गावंडेने ६७ धावांची सलामी दिली. १४७ धावांचा पाठलाग करताना ग्लोरियसच्या भूमी भाटकरने ३७ चेंडूत ३९ धावा फटकावत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण दुसर्‍या बाजूने तिला चांगली साथ न मिळाल्याने ग्लोरियसचा ३४ धावांनी पराभव झाला. मुंबई पोलिसांच्या अक्षता दळवी (३ विकेट) आणि रिया चौधरी (२ विकेट) यांनी चांगली गोलंदाजी केली.

First Published on: February 27, 2019 4:37 AM
Exit mobile version