IND vs AUS : लोकेश राहुलला उपकर्णधार बनवण्याची घाई काय? माजी क्रिकेटपटू संतापला

IND vs AUS : लोकेश राहुलला उपकर्णधार बनवण्याची घाई काय? माजी क्रिकेटपटू संतापला

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल

भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी सोमवारी भारतीय संघ जाहीर झाला होता. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही संघांमध्ये प्रमुख फलंदाज रोहित शर्माचा समावेश नव्हता. रोहितला दुखापत झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. परंतु, रोहित हा एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार असल्याने त्याच्या फिटनेसबाबत अधिक स्पष्टपणे माहिती देणे गरजेचे होते. रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. राहुल सध्या आयपीएल स्पर्धेत किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र, राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्याची निवड समितीने घाई करायला नको होती, असे भारताचा माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ताला वाटते. तसेच रोहित फिट असल्यास त्याला भारतीय संघात घ्यावेच लागेल असेही मत दासगुप्ताने व्यक्त केले.

रोहित पूर्णपणे फिट नाही 

रोहितला सामना खेळून आता काही काळ झाला आहे. मात्र, तो जर मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी फिट असेल, तर त्याचा भारतीय संघात समावेश करावाच लागेल. मला मिळालेल्या माहितीनुसार, आता त्याने नेट्समध्ये सराव करण्यास सुरुवात केली असली, तरी सध्या तो पूर्णपणे फिट नाही. मात्र, हा केवळ काही दिवसांचा प्रश्न आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे आणि पूर्णपणे फिट नसलेल्या खेळाडूला तुम्ही संघात घेणे टाळता. मात्र, तो फिट झाल्यावर तुम्हाला त्याला संघात घ्यावेच लागेल. हे सर्व लक्षात घेता लोकेश राहुलला उपकर्णधार बनवण्याची घाई करण्याची आवश्यकता नव्हती. ही घोषणा नंतरही करता आली असती, असे दीप दासगुप्ता म्हणाला.

First Published on: October 28, 2020 9:06 PM
Exit mobile version