आणि अनुष्काने घेतली ठाम भूमिका…

आणि अनुष्काने घेतली ठाम भूमिका…

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

मोदी सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानानंतरही देशात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. लोकांचे गाडीतून, रेल्वेतून कचरा फेकण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. आपल्या महागड्या गाडीतून फिरणारे शिक्षित लोकही गाडीबाहेर कचरा फेकताना आपल्याला दिसून येतात. अशाच एका उच्चभ्रू व्यक्तीने आपल्या गाडीतून कचरा बाहेर फेकला असता अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याला चांगलाच समज दिला आहे. अनुष्काने समज देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

नक्की काय आहे हा व्हिडिओ?

अरहन सिंग नावाच्या एका तरुणाने आपल्या महागड्या गाडीतून फिरत असताना रस्त्यावर कचरा फेकला. तेव्हा अभिनेत्री अनुष्का शर्माची गाडीही तिथेच होती. तिने त्या गाडीवाल्याला पुढे बोलवत चांगलेच झापले. असे रस्तावर कचरा फेकणे चुकीचे आहे असा समजही तिने त्याला दिला आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

अनुष्काच्या समज देण्याचा घेतला चुकीचा अर्थ

रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहनला अनुष्काने समज दिला असता त्याचा चुकीचा अर्थ अरहन आणि त्याच्या आईने घेतला आहे. अरहन आणि त्याच्या आईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भलीमोठी पोस्ट लिहित अनुष्काला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अरहनच्या आईने तर चक्क अनुष्कावर तिचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप केला. तर व्हिडिओत आपल्या मुलाचा चेहरा ब्लर न केल्याने त्याला होणाऱ्या त्रासाला अनुष्काच जबाबदार असल्याचा आरोपही तिने केला आहे. तर दुसरीकडे स्वत: अरहननेही अनुष्कावर आरोप करत “मी फार थोडा कचरा बाहेर फेकला, ज्यासाठी अनुष्काने केलेला आरडाओरडा ही अतिशयोक्ती होती” असे म्हटले. शिवाय फेकलेल्या कचऱ्यापेक्षा अनुष्काच्या तोंडातून जास्त कचरा बाहेर पडला असे धक्कादायक वक्तव्यदेखील त्याने केले.

अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच आपल्या सामाजिक कार्याबद्दल सतर्क असते हे याआधीही वेळोवेळी दिसून आले आहे. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यक्तीबद्दल अनुष्काने घेतलेल्या ठाम भूमिकेला लोकांतून कसा प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल. शिवाय अरहन आणि त्याच्या आईने केलेल्या आरोपावर विराट आणि अनुष्का यांची काय भूमिका असेल याकडेदेखील सध्या लोकांचे लक्ष आहे.

 

First Published on: June 18, 2018 7:05 PM
Exit mobile version