IND vs AUS : पराभवाची परतफेड करण्याचे लक्ष्य – पॅट कमिन्स

IND vs AUS : पराभवाची परतफेड करण्याचे लक्ष्य – पॅट कमिन्स

पॅट कमिन्स

भारतीय संघाने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे, तेही त्यांच्या मायदेशात, हे खूप मोठे आव्हान मानले जाते. मात्र, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याचा पराक्रम केला होता. भारताने चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली होती. हा पराभव पचवणे ऑस्ट्रेलियाला अवघड गेले होते. त्यामुळे आगामी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक असल्याचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सांगितले.

आम्हाला यंदाच्या कसोटी मालिकेत काहीतरी सिद्ध करायचे आहे. मागील वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात खूपच चांगला खेळ करत कसोटी मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात जिंकण्याला, खासकरून कसोटी मालिका जिंकण्याला खूप महत्त्व देतो. त्यामुळे मागील वर्षी झालेला कसोटी मालिकेतील पराभव पचवणे आम्हाला अवघड गेले होते. यंदा आमचे त्या पराभवाची परतफेड करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, ही मालिका जिंकणे सोपे नसेल. भारताकडे बरेच उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यामुळे या मालिकेतील सामने चुरशीचे होतील याची मला खात्री असल्याचे कमिन्स म्हणाला.

भारताचा कर्णधार विराट कोहली चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील केवळ एकच सामना खेळणार आहे. कर्णधार म्हणून कोहलीची उणीव भारतीय संघाला भासेल. परंतु, त्यांच्याकडे बरेच अप्रतिम फलंदाज आहेत. ते संधीची वाट पाहत असतात. आता कोहलीच्या अनुपस्थितीत त्यांना स्वतःचा खेळ उंचावत भारताला सामने जिंकवून देण्याची संधी मिळणार असल्याचेही कमिन्स सांगितले.

First Published on: November 17, 2020 8:01 PM
Exit mobile version