NZ vs AUS : फिंचचे अर्धशतक; ऑस्ट्रेलियाची टी-२० मालिकेत बरोबरी 

NZ vs AUS : फिंचचे अर्धशतक; ऑस्ट्रेलियाची टी-२० मालिकेत बरोबरी 

अ‍ॅरॉन फिंच

कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ५० धावांनी मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेत २-२ अशी बरोबरी केली असून या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना ७ मार्चला होणार आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली होती. याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव केवळ १०६ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंचने ५५ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनोख्या विक्रमालाही गवसणी घातली. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक पूर्ण केले. ही कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा पहिलाच फलंदाज ठरला.

१४ वे अर्धशतक झळकावले

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि २० षटकांत ६ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली. फिंचने अप्रतिम फलंदाजी करत टी-२० क्रिकेटमधील १४ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला वीस धावांचा टप्पा पार करता आला नाही. फिंच अखेरपर्यंत नाबाद राहिल्याने ऑस्ट्रेलियाने दीडशे धावा पार केल्या.

केन रिचर्डसनच्या तीन विकेट  

१५७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. न्यूझीलंडकडून कायेल जेमिसन (३०), टीम सायफर्ट (१९) आणि डेवॉन कॉन्वे (१७) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यामुळे त्यांचा डाव १८.५ षटकांत १०६ धावांतच आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने ५० धावांनी हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

First Published on: March 5, 2021 8:35 PM
Exit mobile version