जोकोविचची फेडररवर मात; अंतिम फेरीत प्रवेश

जोकोविचची फेडररवर मात; अंतिम फेरीत प्रवेश

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने पुन्हा एकदा आपला जुना प्रतिस्पर्धी रॉजर फेडररला धूळ चारत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियन ओपन ही वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा जोकोविचने आतापर्यंत विक्रमी ७ वेळा जिंकली असून त्याला रविवारी होणार्‍या अंतिम सामन्यात यात भर घालण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीतील सामना हा जोकोविच आणि फेडरर या दोन महान टेनिसपटूंमधील ५० वा सामना ठरला. यात जोकोविचने ७-६ (१), ६-४, ६-३ अशी बाजी मारत अंतिम फेरी गाठली. फेडररला २०१२ नंतर जोकोविचविरुद्ध ग्रँड स्लॅम स्पर्धेत एकही सामना जिंकता आलेला नाही.

सहावेळच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या फेडररला यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करता आला नाही. त्याला उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागली. तिसर्‍या फेरीत जॉन मिल्मनविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी त्याने पाच सेट घेतले, तर अमेरिकेच्या टेनीस सॅण्डग्रेनविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत तब्बल सात मॅच पॉईंट्स वाचवून त्याने स्पर्धेत आगेकूच केली होती.

जोकोविचविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्याची मात्र फेडररने चांगली सुरुवात केली. त्याने पहिल्या सेटमध्ये ४-१ अशी मोठी आघाडी मिळवली, तर जोकोविच सर्व्ह करत असलेल्या सहाव्या गेममध्ये तो ४०-० असा पुढे होता. परंतु, यानंतर त्याने चुका करण्यास सुरुवात केली आणि याचा फायदा घेत जोकोविचने या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी केली. या सेटचा विजेता ठरवण्यासाठी टाय-ब्रेकर खेळवण्यात आला, ज्यात जोकोविचने ७-१ अशी बाजी मारली. दुसर्‍या सेटमध्ये फेडररचा खेळ अधिकच खालावला. त्यामुळे जोकोविचने हा सेट ६-४ असा जिंकला. तिसर्‍या सेटमध्ये जोकोविचने पुन्हा फेडररवर दबाव टाकला. या सेटच्या सहाव्या गेममध्ये जोकोविचने फेडररची सर्व्हिस मोडत ४-२ अशी आघाडी घेतली. यानंतर फेडररला पुनरागमन करता आले नाही आणि त्याने जोकोविचविरुद्ध २७ वा सामना गमावला.

महिलांत मुगुरुझा-केनिन आमनेसामने

गार्बिने मुगुरुझा आणि सोफिया केनिनला ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला एकेरीची अंतिम फेरी गाठण्यात यश आले. स्पेनच्या मुगुरुझाने उपांत्य फेरीत सिमोन हालेपवर ७-६ (१०-८), ७-५ अशी मात केली. तर अमेरिकेच्या केनिनने घरच्या मैदानावर खेळणार्‍या पहिल्या सीडेड अ‍ॅशली बार्टीला ७-६ (८-६), ७-५ असा पराभवाचा धक्का दिला. २१ वर्षीय केनिनची ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही पहिलीच वेळ होती.

First Published on: January 31, 2020 4:05 AM
Exit mobile version