विश्वविजेतेपदाची संधी सोडली!

विश्वविजेतेपदाची संधी सोडली!

कॅचेस विन मॅचेस हे वाक्य आपल्याला जवळपास प्रत्येकच क्रिकेट सामन्यात ऐकायला मिळते. तुम्ही झेल पकडता की सोडता, यावर सामन्याचा निकाल तुमच्या बाजूने लागणार की नाही, हे ठरते. हेच रविवारी पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाहायला मिळाले. भारताची १६ वर्षीय खेळाडू शेफाली वर्मासाठी ही स्पर्धा अविस्मरणीय ठरत होती. मात्र, अंतिम सामन्यात तिने ऑस्ट्रेलियाची सलामीवीर अलिसा हिलीचा पहिल्याच षटकात झेल सोडला. त्यावेळी हिली केवळ ९ धावांवर होती. हा झेल सोडणे भारताला चांगलेच महागात पडले.

हिलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली. तिची सहकारी बेथ मुनीला डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने आपल्याच गोलंदाजीवर जीवनदान दिले आणि याचा फायदा घेत तिने ५४ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी केली. या दोघींच्या खेळींमुळे ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा ८५ धावांनी पराभव करत तब्बल पाचव्यांदा महिला टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले.

गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्याने यंदाच्या महिला टी-२० विश्वचषकाची सुरुवात झाली. या सामन्यात भारताने बाजी मारली होती. हरमनप्रीत कौरच्या संघाने यापुढील तीनही साखळी सामने जिंकत हा विजय फसवा नव्हता हे दाखवून दिले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात मात खाल्यानंतर पुढील सर्व साखळी सामने, तसेच उपांत्य फेरीतील सामना जिंकत अंतिम फेरी गाठली. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.

# हिली-मुनीची आक्रमक फलंदाजी
हिली आणि मुनी या ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीने सुरुवातीपासूनच भारताच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. खासकरून हिलीने पहिल्या षटकापासून आक्रमक शैलीत फलंदाजी केली. तिने दीप्ती शर्माच्या पहिल्याच षटकात तीन, तर शिखा पांडेने टाकलेल्या पुढच्या षटकात आणखी दोन चौकार लगावले. पांडेच्या पुढच्या षटकात मुनीने दोन चौकार मारले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या ५० धावा सातव्या षटकात धावफलकावर लागल्या. हिलीने राजेश्वरी गायकवाडच्या सलग दोन चेंडूवर षटकार लगावले आणि ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पांडेने टाकलेल्या अकराव्या षटकात मुनीने चौकार, तर हिलीने तीन षटकार मारत २३ धावा चोपून काढल्या आणि ऑस्ट्रेलियाच्या १०० धावा पूर्ण केल्या. मात्र, डावखुरी फिरकीपटू राधा यादवविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या नादात हिली ७५ धावांवर बाद झाली. तिने आणि मुनीने ११५ धावांची सलामी दिली. यानंतरच्या फलंदाज आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाल्या. मुनीने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत ५४ चेंडूत १० चौकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ४ बाद १८४ अशी धावसंख्या उभारली.

# मानधना-हरमन पुन्हा अपयशी
१८५ धावांचा पाठलाग करताना भारताला शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना या सलामीच्या जोडीकडून मोठ्या धावांची गरज होती. शेफालीने या स्पर्धेत आपल्या फटकेबाजीमुळे सर्वांना प्रभावित केले. मात्र, अंतिम सामन्यात तिला पहिल्याच षटकात मेगन शूटने यष्टीरक्षक हिलीकरवी झेलबाद केले. तिला केवळ २ धावा करता आल्या. तिची सलामीची साथी मानधनाही केवळ ११ धावा करुन बाद झाला. डावखुरी जेस जोनासनने जेमिमा रॉड्रिग्स (०) आणि कर्णधार हरमनप्रीत (४) यांना झटपट माघारी पाठवले. त्यामुळे भारताची पॉवर-प्लेमध्येच ४ बाद ३० अशी अवस्था झाली. यातून भारतीय संघ सावरू शकला नाही. दीप्ती शर्मा (३३), वेदा कृष्णमूर्ती (१९) आणि रिचा घोष (१८) यांनी काही चांगले फटके मारले. परंतु, ते भारताला विजय मिळवून देण्यासाठी अजिबातच पुरेसे नव्हते. अखेरच्या षटकात शूटने पूनम यादवला बाद करत भारताचा डाव ९९ धावांवर संपवला आणि ऑस्ट्रेलियाने सामना ८५ धावांनी जिंकला.

संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ४ बाद १८४ (बेथ मुनी नाबाद ७८, अलिसा हिली ७५; दीप्ती शर्मा २/३८) विजयी वि. भारत : १९.१ षटकांत सर्वबाद ९९ (दीप्ती शर्मा ३३, वेदा कृष्णमूर्ती १९; मेगन शूट ४/१८, जेस जोनासन ३/२०).

अंतिम सामन्याला विक्रमी उपस्थिती!

यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेला महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना ऐतिहासिक ठरला. हा सामना ८६,१७४ चाहत्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित राहून पाहिला. जगातील कोणत्याही मैदानावर महिला क्रिकेट सामन्यातील ही विक्रमी उपस्थिती ठरली. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या कोणत्याही खेळातील ही विक्रमी उपस्थिती होती. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ८५ धावांनी मात केली. त्यामुळे त्यांनी पाचव्यांदा ही स्पर्धा जिंकली. याआधी २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ मध्ये त्यांनी विश्वविजेतेपद मिळवले होते.

आम्ही योग्य मार्गावर – हरमनप्रीत

भारतीय महिला संघाचे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले, तरी आम्ही योग्य मार्गावर आहोत, असे विधान कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर केले. आम्ही साखळी सामन्यांत उत्कृष्ट खेळ केला. अंतिम सामन्यात आम्ही झेल सोडले आणि ते आम्हाला महागात पडले. मात्र, माझा माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. पुढील एक-दीड वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचे असेल. आम्ही क्षेत्ररक्षण सुधारणे गरजेचे आहे. तुम्ही काही सामने जिंकता आणि काही सामने हरता. परंतु, त्यातून शिकत राहणे गरजेचे असते. मागील टी-२० विश्वचषकात आम्ही उपांत्य फेरी गाठली होती, तर यावेळी आम्हाला अंतिम फेरी गाठण्यात यश आले. आम्ही योग्य मार्गावर आहोत. दरवर्षी आमच्या खेळात सुधारणा होत आहे, असे हरमनप्रीतने नमूद केले.

भारतीय महिला संघाने टी-२० विश्वचषकात झुंजार खेळ केला. त्यांचा अभिमान आहे. तुम्ही दमदार पुनरागमन करुन भविष्यात खूप यश मिळवाल याची खात्री आहे. – विराट कोहली

आपल्या मुलींनी सर्वोतपरी प्रयत्न केले, पण दिवस त्यांचा नव्हता. मात्र, अंतिम सामना वगळता त्या ज्याप्रकारे खेळल्या, ते पाहून खूप बरे वाटले. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा. महिला टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. – विरेंद्र सेहवाग

ऑस्ट्रेलियन संघाचे महिला टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. मी भारतीय महिला संघाला सांगू इच्छितो की, त्यांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. या संपूर्ण स्पर्धेत त्यांचा खेळ पाहताना खूप मजा आली. त्यांना पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. – व्ही.व्ही.एस लक्ष्मण

भारतीय महिला संघ, तुम्हाला मान खाली घालायची अजिबातच गरज नाही. तुम्ही महिला टी-२० विश्वचषकात खूपच चांगला खेळ केला आणि एके दिवशी विश्वचषक तुमच्या हातात असेल. विश्वास कायम ठेवा. – व्हीव रिचर्ड्स

First Published on: March 9, 2020 5:54 AM
Exit mobile version