SA vs PAK : बाबर आझमचे दमदार शतक; तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान विजयी

SA vs PAK : बाबर आझमचे दमदार शतक; तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान विजयी

मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम

कर्णधार बाबर आझमने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट राखून पराभूत केले. या विजयासह पाकिस्तानने चार सामन्यांच्या या टी-२० मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ५ बाद २०३ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना कर्णधार बाबर आणि मोहम्मद रिझवान या सलामीवीरांनी पाकिस्तानच्या डावाची अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी १९७ धावांची भागीदारी रचली. बाबरने ५९ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १२२ धावांची खेळी केली. हे त्याचे टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. त्याला रिझवानने ४७ चेंडूत नाबाद ७३ धावांची खेळी करत उत्तम साथ दिली. त्यामुळे पाकिस्तानने १२ चेंडू शिल्लक असतानाच २०४ धावांचे लक्ष्य गाठले.

मार्करम, मलानची अर्धशतके 

त्याआधी बाबरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची दमदार सुरुवात झाली. यानमन मलान आणि एडन मार्करम यांनी १०८ धावांची सलामी दिली. मार्करमने ३१ चेंडूत ६३ धावांची, तर मलानने ४० चेंडूत ५५ धावांची खेळी केल्यावर या दोघांना डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने बाद केले. यानंतर जॉर्ज लिंडे (२२) आणि रॅसी वॅन डर डूसेन (नाबाद ३४) यांनी फटकेबाजी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ५ बाद २०३ अशी धावसंख्या उभारली होती.

First Published on: April 14, 2021 10:52 PM
Exit mobile version