Ball Tampering Scandal : ऑस्ट्रेलियन गोलंदाज येणार अडचणीत? बॉल टॅम्परिंगबाबत बँक्रॉफ्टचा धक्कादायक खुलासा

Ball Tampering Scandal : ऑस्ट्रेलियन गोलंदाज येणार अडचणीत? बॉल टॅम्परिंगबाबत बँक्रॉफ्टचा धक्कादायक खुलासा

बॉल टॅम्परिंगबाबत कॅमरुन बँक्रॉफ्टचा धक्कादायक खुलासा

स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमरुन बँक्रॉफ्ट या ऑस्ट्रेलियाच्या तीन क्रिकेटपटूंवर २०१८ साली बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे बंदी घालण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊन कसोटीत बँक्रॉफ्टने सँडपेपरचा तुकडा वापरत चेंडूशी छेडछाड केली होती. हा सर्व प्रकार टीव्ही कॅमेरात कैद झाल्याने बँक्रॉफ्टसह कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांच्यावर बरीच टीका झाली होती. तसेच स्मिथ आणि वॉर्नर या सिनियर खेळाडूंवर एका वर्षाची, तर बँक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. मात्र, बॉल टॅम्परिंग केले जात असल्याची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही होती, असा धक्कादायक खुलासा आता बँक्रॉफ्टने केला आहे.

वेगळे सांगायची गरज नाही

मी जी कृती केली, त्याची जबाबदारी घेणे हे माझे कर्तव्यच होते. मात्र, मी जे केले, त्याचा गोलंदाजांना नक्कीच फायदा झाला. चेंडू सतत गोलंदाजांच्या हातात येत होता. त्यामुळे चेंडूसोबत काहीतरी केले जात आहे याची त्यांना कल्पना असणार हे वेगळे सांगायची गरज नाही, असे बँक्रॉफ्ट एका मुलाखतीत म्हणाला. तसेच गोलंदाजांना खरेच बॉल टॅम्परिंगबाबत माहिती होती का? असे बँक्रॉफ्टला पुन्हा विचारले गेले. हो. त्यांना चेंडूसोबत काय होत आहे, हे माहित असणारच. मी वेगळे काही सांगण्याची गरज नाही, असे बँक्रॉफ्टने सांगितले.

प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार?

बँक्रॉफ्टच्या या खुलाशानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी सुरु करण्याची तयारी दर्शवली आहे. २०१८ केप टाऊन कसोटीत जे घडले, त्याबाबत अधिक कोणाला काही माहित असल्यास त्यांनी पुढे यावे. आमची या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची तयारी आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले. बँक्रॉफ्ट सध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत असून तिथेच त्याने एका वृत्तपत्राला मुलाखत देत हा खुलासा केला.

First Published on: May 15, 2021 7:48 PM
Exit mobile version