T20 World Cup: टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च, पाहा काय आहेत वैशिष्ट्य!

T20 World Cup: टीम इंडियाची नवीन जर्सी लॉन्च, पाहा काय आहेत वैशिष्ट्य!

मुंबई –आशिया चषकातील पराभवानंतर आता क्रिकेटप्रेमींना पुढच्या महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाची आस लागलेली आहे. त्यातच, आज मुंबईतील एका कार्यक्रमात टीम इंडियाच्या जर्सीचे अनावरण करण्यात आलं. नेहमीप्रमाणे ही जर्सी निळ्या रंगाची असून त्यावर तीन स्टार लावण्यात आले आहेत. टीम इंडियाच्या या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – टी-20 विश्वचषकात भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत

ऑक्टोबर महिन्यापासून जगभरात टी-२० विश्वचषक रंगणार आहे. त्यासाठी क्रिकेट प्रेमी आतुर झाले आहेत. आशिया कपमध्ये पाकिस्तानने हरवल्यानंतर भारत आता टी-२० च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरोधात लढणार आहे. त्यामुळे या विश्वचषकाचा पहिलाच सामना अटीतटीचा होणार असून याकडे संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, विश्वचषकाआधी भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात तीन तीन सामन्याची टी 20 मालिका खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये टीम इंडिया मिशन वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.


काय आहे जर्सीचं वैशिष्ट्य

नेहमीप्रमाणे यंदाही जर्सी निळ्या रंगाची आहे. आधीच्या जर्सीपेक्षा नव्या जर्सीचा रंग थोडा फिकट आहे.२००७ साली जर्सीचा जसा रंग होता, त्याप्रमाणे थोडाफार आहे. तसंच, आतापर्यंत भारताने तीन विश्वचषक जिंकले असल्याने जर्सीवर तीन स्टार लावण्यात आले आहेत. MPL ने 2020 मध्ये किट प्रायोजक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर इतक्या वर्षांतील ही तिसरी भारतीय जर्सी आहे.


भारतीय संघात कोण आहेत?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

हेही वाचा – टी-20 मालिकेत विराटला दोन रेकॉर्ड करण्याची संधी, द्रविडचाही विक्रम मोडणार?

राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.

ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर महिन्यात टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या 7 शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जाणार आहेत. तसेच, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे.

First Published on: September 18, 2022 9:10 PM
Exit mobile version