IND vs AUS : ‘या’ दिवशी ठरणार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही!

IND vs AUS : ‘या’ दिवशी ठरणार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही!

रोहित शर्मा

आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नुकतीच भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही संघांची घोषणा झाली. एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला तिन्ही संघांमध्ये स्थान न मिळाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. रोहितला सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत दुखापत झाली. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सच्या गेल्या काही सामन्यांना मुकला आहे. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे? हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु, रविवारी रोहितच्या दुखापतीबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम रविवारी रोहितची फिटनेस चाचणी घेणार असल्याची माहिती आहे.

रोहितची रविवारी फिटनेस चाचणी होईल आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही, हे ठरेल. रोहितच्या पायाला दुखापत झाली आहे. पायाला दुखापत झाल्यास खेळाडूला धावताना त्रास जाणवतो. त्यामुळे धावताना रोहितला त्रास जाणवतोय का, तसेच तो धावण्याचा वेग कमी किंवा जास्त सहजपणे करू शकतोय का? यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. या चाचणीतून रोहितच्या दुखापतीबाबत अधिक माहिती मिळेल. तो पूर्णपणे फिट झाला आहे का? की त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे? हे या चाचणीतून स्पष्ट होईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

आयपीएल स्पर्धेत १८ ऑक्टोबरला मुंबई आणि पंजाब यांच्यात सामना झाला होता, ज्यात विजेता ठरवण्यासाठी दोन सुपर ओव्हर खेळवाव्या लागल्या. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी केल्यावर रोहितच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सच्या गेल्या काही सामन्यांना मुकला आहे. आज झालेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही रोहित खेळू शकला नाही.

 

First Published on: October 31, 2020 6:34 PM
Exit mobile version