IPL 2022 : आयपीएलच्या लिलावातून ऑलराऊंडर बेन स्टोक्स आऊट, जाणून घ्या कारण

IPL 2022 : आयपीएलच्या लिलावातून ऑलराऊंडर बेन स्टोक्स आऊट, जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 हंगामाला मार्च-एप्रिल महिन्यांपासून सुरूवात होण्याची शक्यता आहे. आयपीएलसाठी मेगा ऑक्शन सुद्धा येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. तसेच यंदाच्या हंगामात दोन नवीन टीमचं देखील स्वागत केलं जाणार आहे. त्यासाठी कर्णधार कोण असेल ?, यावर चर्चेला उधाण आलंय. मात्र, आता धक्कादायक म्हणजे इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार जो रूटनंतर आता बेन स्टोक्सने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेटमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी त्याने व्यावसायिक क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे इंग्लंडमधील मायदेशात होणाऱ्या खेळांवर आणि मालिकांवर त्याला लक्ष केंद्रीत करायचं आहे. कारण स्टोक्सचं अॅशेस मालिकेतील प्रदर्शन उत्तम राहिलेलं नाहीये. त्याने केवळ २३६ धावा काढल्या असून ४ विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडला या मालिकेत ०-४ अशा लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. इंग्लडंचे माजी कर्णधार डेविड गावर यांच्यासह अन्य दिग्गजांनी इंग्लंडच्या कसोटीतील फ्लॉपशोला टी-२० लीग स्पर्धा कारणीभूत असल्याचे म्हटले होते. स्टोक्स यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून बाहेर राहणार आहे. आयपीएलमध्ये दहा संघाचा समावेश असून खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे. मात्र, बेन स्टोक्स यंदाच्या आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीये.

स्टोक्सला मागील काही वर्षांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याचे वडील ग्रेड यांचं १३ महिन्यांपूर्वीचं निधन झालं होतं. त्यामुळे मानसिक तणावात असलेल्या स्टोक्सनं क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर हाताच्या बोटांना दुखापत झाल्यामुळे आयपीएल २०२१ च्या पहिल्या सत्रात त्याचा सहभाग नव्हता. मात्र, आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात सुद्धा राजस्थान रॉयल्सच्या संघातून तो खेळला नव्हता.

दरम्यान, आयपीएलमधून बाहेर राहिल्यामुळे स्टोक्सला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. परंतु मार्चमध्ये होणाऱ्या इंग्लंडच्या दौऱ्यानंतर तो मायदेशात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणार असल्याचं सांगितलं जातंय.


हेही वाचा : Dhanush Aishwarya Seprated : धनुष ऐश्वर्याचा घटस्फोट, विभक्त होण्याचा ट्विटरवर केला खुलासा


 

First Published on: January 18, 2022 8:50 AM
Exit mobile version