सुरुवातीला कमी अपेक्षा असणे चांगले !

सुरुवातीला कमी अपेक्षा असणे चांगले !

हनुमा विहारीचे मत

मागील वर्षी इंग्लंड दौर्‍यासाठी कोणालाही अपेक्षा नसताना फलंदाज हनुमा विहारीची भारतीय कसोटी संघात निवड झाली. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर त्याने भारत ‘अ’कडूनही कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत चांगले प्रदर्शन केले आहे. मागील आठवड्यात झालेल्या इराणी करंडकात त्याने शेष भारताकडून खेळताना विदर्भाविरुद्ध दोन्ही डावांत शतके केली. मात्र, अजून त्याला टी-२० मध्ये विशेष यश मिळालेले नाही. टी-२० मध्ये त्याचा स्ट्राईक रेटही चांगला नसल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये विहारीकडून चाहत्यांना फार अपेक्षा नाहीत, पण मोसमाच्या सुरुवातीला चाहत्यांना कमी अपेक्षा असणे माझ्यासाठी चांगले असू शकेल, असे मत विहारीने व्यक्त केले आहे.

पूर्वी खेळलेल्या टी-२० सामन्यांमध्ये माझा स्ट्राईक रेट चांगला नव्हता. त्यामुळे चाहत्यांना माझ्याकडून फार अपेक्षा नसणार. ही माझ्यासाठी चांगली गोष्ट असू शकते. मी या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. कारण आता मला या लोकांना चुकीचे ठरवण्याची संधी मिळणार आहे, असे विहारी म्हणाला.

विहारी यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. या संघात शिखर धवन, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, रिषभ पंत या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे विहारीला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवणे अवघड जाऊ शकेल. मात्र, तीन वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत असल्याने तो कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे. खरे सांगायचे तर मी तीन वर्षांनी खेळत असल्याने कोणत्याही स्थानावर खेळण्यास मी तयार आहे. मग ते सलामीवीर म्हणून खेळावे लागो की फिनिशर म्हणून. संघ व्यवस्थापन जे करायला सांगेल, ते करण्यासाठी मी तयार आहे, असे विहारीने सांगितले.

First Published on: February 23, 2019 4:51 AM
Exit mobile version