चूक हरभजनची की श्रीसंतची? १० वर्षांनी केला खुलासा

चूक हरभजनची की श्रीसंतची? १० वर्षांनी केला खुलासा

फोटो सौजन्य- दैनिक जागरण

भारतीय क्रिकेटर एस. श्रीसंतचं स्पॉट फिक्सींग प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर क्रिकेटविश्व आणि माध्यमांपासून दूर गेलेला श्रीसंत, आता बिग बॉस १२ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांसमोर आला आहे. आता ‘बिग बॉस’चं घर म्हटलं की वाद-विवाद, कॉन्ट्रव्हर्सीज आणि धक्कादायक खुलासे या गोष्टी आल्याच. याच धर्तीवर बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या श्रीसंतने  स्पॉट फिक्सींगबाबत नुकताच एक नवा खुलासा केला आहे. श्रीसांतच्या या धक्कादायक खुलाश्यामुळे बिग बॉसच्या घरात नवीन चर्चांना उधाण आलं आहे. IPL च्या २००८ च्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्या मॅचदरम्यान, हरभजनने श्रीसंतच्या श्रीमुखात भडकवल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या घटनेनंतर हरभजनला पुढच्या मॅचमधून बाहेरचा रस्ताही दाखविण्यात आला होता. याप्रकरणाचा उल्लेख जेव्हा बिग बॉसच्या एका ‘टास्क’ दरम्यान केला गेला, तेव्हा श्रीसंतने त्या प्रकरणात नेमकी चूक कुणाची होती याविषयी खुलासा केला.

चूक माझीच…

बिग बॉसच्या घरात यावर स्पष्टीकरण देताना श्रीसांत म्हणाला की, २००८ मध्ये मी आक्रमक झालो ही माझी चूकच झाली. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात चंढीगडला झालेली मॅच, मी जरा जास्तच अाक्रमक झालो होतो. चंदीगढ हे भज्जीचं होमपीच होतं आणि तो तेव्हा कॅप्टनही होता. ‘श्री ही इंडिया-पाकिस्तान मॅच नाही’ असं त्याने मला आधीच सांगितलं होतं. मात्र, मॅचमध्ये तो बॅटिंग करायला आल्यावर मी त्याची विकेट घेतली आणि फिल्डवर त्याचा जरा जास्तच आनंद साजरा केला. त्यामुळे हरभजन चांगलाच नाराज झाला.

कानाखाली मारली नव्हती…

व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये जे दिसलं ते खरं नव्हतं. ते मला आणि भज्जीला बदनाम करण्यासाठी करण्यात आलं होतं. हरभजनने माझ्यावर हात उगारला होता पण त्याने मला कानाखाली मारली नव्हती. रागाच्या भरात आम्ही दोघांनीही लाईन क्रॉस केली होती. मी त्याला मोठ्या भावाप्रमाणे मानायचो. पण रागाच्या भरात तो असं काही करेल याची मला अपेक्षाही नव्हती. मी त्या घटनेनंतर मला खूप एकटेपण जाणवलं होतं. मी असहाय्य झालो होतो. मी बिथरलो आणि फिल्डवरच रडायला लागलो.

शेवटी श्रीसांत म्हणाला की, आज १० वर्षांनंतर सगळं ठीक आहे. मी आणि हरभजन चांगले मित्र आहोत आणि मी आजही त्याला माझा मोठा भाऊ मानतो. आज भज्जी माझ्याशी आणि माझ्या कुटुंबियांशी पूर्वीसारखाच संपर्कात असतो. आमचं येणं-जाणं सुरु असतं. आमच्यातील सगळे वाद, गैरसमज आता मिटले असून, आम्ही पुन्हा चांगले मित्र झालो आहोत.

 

First Published on: November 23, 2018 8:19 PM
Exit mobile version