बोल्ट म्हणतो, ‘असं पाळा सोशल डिस्टंसिंग’

बोल्ट म्हणतो, ‘असं पाळा सोशल डिस्टंसिंग’

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूवर अद्याप औषध आलेलं नाही. या धोकादायक विषाणूचा संसर्ग टाळण्याचा एक मार्ग म्हणजे सोशल डिस्टंसिंग अर्थात सामाजिक अंतर. लोकांना आवश्यक अंतर राखण्यासाठी सतत आवाहन केलं जात आहे. जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्टनेही स्वत: च्या शैलीत सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन केलं आहे. बोल्टने आपला जुना फोटो सोशल मीडियावर शेअर करत सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन केलं. या कठीण परिस्थितीत प्रत्येकाने कसं पुरेसं अंतर राखलं पाहिजे हे दर्शविण्यासाठी बोल्टने आपला फोटो शेअर केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – ‘सोशल डिस्टिन्सिंग’. त्याने आपल्या चाहत्यांना ईस्टरच्या शुभेच्छा देखील दिल्या.

३३ वर्षीय बोल्टने आपला जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बोल्टने १०० मीटर अंतिम फेरी जिंकली तेव्हाच्या ऐतिहासिक क्षणाचा हा फोटो आहे. त्याने ही शर्यत ९.६९ सेकंदात पूर्ण करत जागतिक आणि ऑलिम्पिक विक्रम केला होता. बीजिंगमधील बर्ड नेस्ट स्टेडियमवर उसेन बोल्टने १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकलीच, पण अमेरिकन धावपटू रिचर्ड थॉम्पसनपेक्षा तो ०.२० सेकंद पुढे होता. थॉम्पसनचा दुसरा क्रमांक आला होता. बोल्टने त्याच ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर शर्यत जिंकली होती आणि त्याने पुन्हा १९.३० सेकंदाच्या वेळेसह जागतिक आणि ऑलिम्पिक विक्रम मोडला. यासह बोल्ट दुसऱ्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ठरला. ११ विश्व आणि ८ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या बोल्टने १०० मीटर, २०० मीटर आणि ४x१०० मीटर रिलेमध्ये जागतिक विक्रम नोंदवला आहे.

 

First Published on: April 14, 2020 1:30 PM
Exit mobile version