आयपीएल सामन्यांवर बेटींग घेणार्‍या बुकींना अटक

आयपीएल सामन्यांवर बेटींग घेणार्‍या बुकींना अटक

कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात खेळण्यात आलेल्या आयपीएल सामन्यावर ऑनलाईन बेटींग घेणार्‍या तीन बुकींना गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आदित्य ज्ञानेश्वर नायकोंडी, अभिषेक घेवरचंद बाफना, अरविंद ऊर्फ लारा पृथ्वीराज जैन अशी या तिघांची नावे आहेत.

या कारवाईत पोलिसांनी एक व्हिडीओकॉन कंपनीचा 50 इंच एलसीडी टिव्ही, पाच मोबाईल, कॅश, टाटा स्काय कंपनीचा सेट टॉप बॉक्स जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध भादवी, जुगार प्रतिबंधक कायद्यासह आयटी कलमांतर्गतगुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तिघांना नंतर शिवडी येथील लोकल कोर्टात हजर करण्यातआले होते. या गुन्ह्यांत काही बुकींना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले असून त्यात कुणिक जैन, उत्सव विरा आणि पार्श्व शहा यांचा समावेश आहे.

सोमवारी कोलकाता आणि राजस्थान या दोन संघामध्ये आयपीएलची मॅच खेळविण्यात आली होती. गिरगाव येथे या सामान्यावर काहीजण ऑनलाईन बेटींग घेत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने गिरगाव येथील राजाराम मोहन रॉय रोड, लालचर्च जवळील प्रो फिटनेस क्लबजवळील कोठारी हाऊसच्या इमारतीच्या टेरेसवर छापा टाकून ही कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांना आदित्य, अभिषेक आणि अरविंद हे तिघेही ऑनलाईन बेटींग घेताना दिसून आले. क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेण्यासाठी एका खाजगी वेबसाईटचा वापर झाला होता. ही वेबसाईट पार्श्व शहाने बनवून त्याद्वारे बेटींग घेतली जात होता. त्यांच्याकडे पोलिसांना काही नोंद सापडल्या असून त्यात कोट्यवधी रुपयांची बेटींग घेतल्याचे उघडकीस आले आहे.

या तिघांनाही नंतर पोलिसांनी अटक करुन शिवडी कोर्टात हजर केले होते. त्यांच्या चौकशीतून कुणिक जैन, उत्सव विरा आणि पार्श्व शहा यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.


हेही वाचा – IPL 2022: मुंबई-चेन्नईच्या सामन्यात चक्क ब्राव्होनं भिरकावला पोलार्डच्या दिशेनं चेंडू; नेमकं काय घडलं?

First Published on: April 21, 2022 10:01 PM
Exit mobile version