गोलंदाज मला अजूनही घाबरतात – गेल

गोलंदाज मला अजूनही घाबरतात – गेल

क्रिस गेल

इंग्लंडमध्ये होणारा आगामी क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी भारत आणि इंग्लंड या संघांना प्रमुख दावेदार मानले जात असले तरी क्रिस गेल, आंद्रे रसेलसारखे ताबडतोड खेळाडू असल्याने वेस्ट इंडिज संघापासूनही इतर संघानी सावध राहिले पाहिजे असे अनेक क्रिकेट समीक्षकांचे मत आहे. काही महिन्यांपूर्वीच गेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास संपली आहे, असे मत व्यक्त केले जात होते.

मात्र, त्याने इंग्लंडविरुद्धच्या मागील एकदिवसीय मालिकेच्या ४ सामन्यांत १०६च्या सरासरीने ४२४ धावा करत टीकाकारांची तोंड बंद केली होती, तर आता आपल्या अखेरच्या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचे त्याचे लक्ष्य असून गोलंदाज मला अजूनही घाबरतात असे विधान त्याने केले आहे.

मी आधी जितक्या सहजतेने फटकेबाजी करायचो, तितकी आता करू शकत नाही. मी आधी खूप चपळ होतो. त्यामुळे आता विरोधी संघातील युवा खेळाडू मला लक्ष्य बनवतात. मात्र, मला खात्री आहे की त्या खेळाडूंच्या डोक्यात हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात धोकादायक फलंदाज आहे हा विचार सुरु असेल. मी खात्रीने सांगू शकतो की गोलंदाज मला अजूनही घाबरतात. तुम्ही त्यांना जाऊन विचारा.

तुम्ही गेलला घाबरता का, हा प्रश्न त्यांना कॅमेरा सुरु असताना विचारलात, तर ते या गोष्टीला नकार देतील. मात्र, तुम्ही कॅमेरा बंद करताच तुम्हाला वेगळे उत्तर मिळेल. परंतु, मला याचे फार काही वाटत नाही. मला वेगवान गोलंदाजांचा सामना करताना खूप मजा येते, असे गेल म्हणाला.

First Published on: May 23, 2019 4:10 AM
Exit mobile version