बुमराहवर टीम इंडिया अवलंबून

बुमराहवर टीम इंडिया अवलंबून

मायकल क्लार्कचे विधान

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा अप्रतिम प्रदर्शन करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करताना अवघ्या २२४ धावाच करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २ बाद १०६ असा सुस्थितीत होता. मात्र, बुमराहने एकाच षटकात २ विकेट्स घेत त्यांच्या डावाला खिंडार पाडला आणि भारताला सामना जिंकवून दिला. भारताला हा विश्वचषक जिंकायचा असल्यास बुमराहला पुढेही अशीच कामगिरी करावी लागणार आहे, कारण हा संघ त्याच्यावर अवलंबून आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने व्यक्त केले.

बुमराह हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. गोलंदाजीत कोणतीही अशी गोष्ट नाही, जी तो करू शकत नाही. तो नवा चेंडू स्विंग आणि सीम करू शकतो. मधल्या षटकांत गोलंदाजांना मदत नसताना तो अधिक वेगाने गोलंदाजी करून फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. तो १५० च्या वेगाने गोलंदाजी करण्यात सक्षम आहे. अखेरच्या षटकांमध्ये तो उत्कृष्ट यॉर्कर टाकतो. तसेच चेंडू रिव्हर्स स्विंग होत असताना त्याच्यासारखा गोलंदाज नाही. बुमराहसारखा गोलंदाज प्रत्येक कर्णधाराला आपल्या संघात हवा असतो. तो सुरुवातीच्या षटकांमध्ये गोलंदाजी करू शकतो, तो ३५व्या षटकात जेव्हा गोलंदाजांना मदत नसते, तेव्हा गोलंदाजी करू शकतो आणि अखेरच्या षटकांत तर तो अप्रतिम गोलंदाजी करतोच. भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याचे बुमराह हा मुख्य कारण असू शकेल, असे क्लार्क म्हणाला.

भारताने या विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्ये ही स्पर्धा होत असूनही भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह खेळत आहे. भारताचा हा निर्णय योग्य आहे, असे क्लार्कला वाटते. याबाबत तो म्हणाला, भारताचा संघ खूप प्रतिभावान आहे. त्यांचा दोन फिरकीपटूंसह खेळण्याचा निर्णय योग्यच आहे. ते दोघेही आक्रमक गोलंदाज आहेत आणि मधल्या षटकांत ते विकेट्स मिळवतात. विराटने या संघाचे नेतृत्त्व चांगल्या प्रकारे केले आहे. त्यांचा संघ सध्या उत्कृष्ट क्रिकेट खेळत आहे.

First Published on: June 25, 2019 4:18 AM
Exit mobile version