कर्णधार मनप्रीत सिंगची ऐतिहासिक कामगिरी!

कर्णधार मनप्रीत सिंगची ऐतिहासिक कामगिरी!

कर्णधार मनप्रीत सिंग

भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगचा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनकडून सन्मान करण्यात आला आहे. त्याची २०१९ वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. १९९९ साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरस्कारांना सुरुवात झाली. तेव्हापासून सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवणारा मनप्रीत हा पहिला भारतीय हॉकीपटू ठरला आहे. त्याने हा पुरस्कार मिळवताना बेल्जियमचा आर्थर वॅन डॉरेन आणि अर्जेंटिनाच्या लुकास विला यांना मागे टाकले.

२०११ साली आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये पदार्पण करणार्‍या मनप्रीतने आतापर्यंत २६० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१७ मध्ये त्याला पहिल्यांदा भारताचे कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. त्याच्या नेतृत्वात भारताने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवले. भारताने पात्रता फेरीत रशियाचा ७-२ असा धुव्वा उडवला.

२०१९ मोसमाबाबत मनप्रीत म्हणाला, आमच्या संघाने प्रत्येक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. आम्ही बेल्जियम आणि स्पेनसारख्या संघांचा पराभव केला. २०१९ मध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचे आमचे प्रमुख लक्ष्य होते आणि आम्ही ते गाठू शकलो याचा आनंद आहे.

First Published on: February 14, 2020 5:39 AM
Exit mobile version