कॅरबाओ कप : अ‍ॅश्टन विला अंतिम फेरीत

कॅरबाओ कप : अ‍ॅश्टन विला अंतिम फेरीत

महमूद हसनने (ट्रेझगेत) अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना केलेल्या गोलमुळे अ‍ॅश्टन विलाने इंग्लंडमधील फुटबॉल स्पर्धा कॅरबाओ कपच्या (लीग कप) दुसर्‍या लेगमध्ये लेस्टर सिटीवर २-१ अशी मात केली. या लढतीचा पहिला लेग १-१ असा बरोबरीत संपला होता. त्यामुळे विलाने संपूर्ण लढतीत ३-२ अशी बाजी मारत कॅरबाओ कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यांचा या फेरीत मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी यांच्यातील विजेत्याशी सामना होईल. सिटीने युनायटेडच्या घरच्या मैदानावर झालेला पहिला लेग ३-१ असा जिंकला होता.

लेस्टर आणि अ‍ॅश्टन विला यांच्यातील दुसर्‍या लेगची लेस्टरने आक्रमक सुरुवात केली. स्ट्रायकर केलेची इहीनाचो आणि जेम्स मॅडिसन यांनी सुरुवातीच्या काही मिनिटांतच गोलच्या संधी मिळाल्या. मात्र, विलाचा गोलरक्षक ओर्यन नेलँडच्या अप्रतिम खेळामुळे त्यांना संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. पुढे विलाने आपल्या खेळात सुधारणा केली आणि याचा फायदा त्यांना १२ व्या मिनिटाला मिळाला. कर्णधार जॅक ग्रिलीशच्या पासवर मॅट टार्गेटने गोल करत अ‍ॅश्टन विला संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लेस्टरने बराच वेळ फुटबॉल आपल्याकडे राखला. मात्र, विलाच्या खेळाडूंनी भक्कम बचाव करत मध्यंतराला आपली आघाडी कायम राखली.

उत्तरार्धात लेस्टरने चांगले पुनरागमन केले. ७२ व्या मिनिटाला इहीनाचोने केलेल्या गोलमुळे लेस्टरने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. पुढे जॉनी एव्हन्स आणि मॅडिसन यांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण त्यांना याचा फायदा घेता आला नाही. हा सामना ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत जाणार असे वाटत असतानाच एलमोहमदीच्या पासवर महमूद हसनने (ट्रेझगेत) गोल केला आणि अ‍ॅश्टन विलाला हा सामना २-१ असा जिंकवून दिला.

३२ सामन्यांत पहिला पराभव

लेस्टर सिटीचे प्रशिक्षक ब्रँडन रोजर्स यांनी मार्गदर्शन केलेल्या संघांनी स्थानिक फुटबॉलमध्ये सलग ३१ सामने जिंकले होते. लेस्टरला मार्गदर्शन करण्याआधी ते स्कॉटिश संघ सेल्टिकचे प्रशिक्षकपद भूषवत होते. लेस्टरला त्यांच्या प्रशिक्षकांची विजयाची मालिका सुरु ठेवण्यासाठी अ‍ॅश्टन विलाविरुद्ध बर्‍याच संधी मिळाल्या. मात्र, त्यांना याचा फायदा घेता आला नाही. विलाने ही लढत जिंकत १ मार्चला होणार्‍या अंतिम फेरीत प्रवेश केला.

First Published on: January 30, 2020 5:43 AM
Exit mobile version