शतकवीर शर्मामुळे रेल्वे फ्रंटफूटवर!

शतकवीर शर्मामुळे रेल्वे फ्रंटफूटवर!

करण शर्मा

रेल्वेच्या करण शर्माने कर्णधाराला साजेसा खेळ करताना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रणजी स्पर्धेतील आपले दुसरे शतक साजरे केले. १२ वर्षांपूर्वी रणजी करंडकात पदार्पण करणार्‍या करणला आपल्या दुसर्‍या शतकासाठी प्रदीर्ष काळ प्रतीक्षा करावी लागली. परंतु, त्याने मुंबईविरुद्ध मुंबईतच शतक झळकावण्याची किमया केली.

निम्मा संघ ४३ धावांतच माघारी परतला असताना अरिंदम घोष (१३० चेंडूत ७२) आणि अविनाश यादव (५३ चेंडूत ३४) यांच्या साथीने उपयुक्त भागीदार्‍या रचणार्‍या करणच्या शतकामुळे (१४६ चेंडूत १३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ११२) रेल्वेने मुंबईविरुद्ध पहिल्या डावात २६६ धावांची मजल मारली. पहिल्या डावात १५२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या मुंबईने दुसर्‍या दिवसअखेरीस दुसर्‍या डावात पृथ्वी शॉ, जय बिस्ता आणि सिद्धेश लाड यांच्या विकेट गमावल्या. त्यामुळे त्यांची ३ बाद ६४ अशी धावसंख्या असून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि कसोटीपटू अजिंक्य रहाणेवर मुंबईची मदार असेल.

सूर्य ग्रहणामुळे रणजी लढती पुढे ढकलण्यात आल्या. याचा फायदा मुंबईला नव्हे, तर रेल्वेला झाला. वानखेडेच्या खेळपट्टीतील दाहकता कमी झाली. कर्णधार करण आणि अरिंदम घोष यांनी मुंबईच्या गोलंदाजीतील त्रुटींचा फायदा घेत चौकार, षटकार वसूल केले. त्यामुळे रेल्वेची आघाडी वाढत गेली. तुषार देशपांडेने ४४ धावांत ४ मोहरे टिपले, पण तोपर्यंत रेल्वेने वर्चस्व मिळवले.

१५२ धावांच्या पिछाडीनंतर मुंबईला दमदार सलामीची गरज होती. मात्र, पृथ्वी (२३), बिस्ता (१३) आणि लाड (८) यांनी विकेट फेकल्या. यानंतर रहाणे आणि सूर्यकुमारने संयमाने फलंदाजी केली. रहाणेने ३ धावा करण्यासाठी ४५, तर सूर्यकुमारने १५ धावा करण्यासाठी ३८ चेंडू घेतले. दिवसअखेर मुंबईची दुसर्‍या डावात ३ बाद ६४ अशी धावसंख्या होती.

First Published on: December 27, 2019 5:28 AM
Exit mobile version