Champions League : चेल्सीची अ‍ॅटलेटिको माद्रिदवर मात; जिरुड ठरला मॅचविनर 

Champions League : चेल्सीची अ‍ॅटलेटिको माद्रिदवर मात; जिरुड ठरला मॅचविनर 

ऑलिव्हिएर जिरुड

ऑलिव्हिएर जिरुडने केलेल्या उत्कृष्ट गोलच्या जोरावर चेल्सीने युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या सामन्यात अ‍ॅटलेटिको माद्रिदवर १-० अशी मात केली. कोरोनामुळे उप-उपांत्यपूर्व फेरीचा पहिला लेग अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या घरच्या मैदानावर होऊ शकला नाही. त्याऐवजी हा सामना रोमेनियाची राजधानी बुकारेस्ट येथे झाला. पूर्वार्धात या सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. परंतु, उत्तरार्धात गिरुडने ‘बायसिकल किक’ मारत गोल केला. त्याच्या या गोलमुळे चेल्सीने हा सामना जिंकला. अ‍ॅटलेटिको माद्रिदचा संघ बचावात्मक खेळ करण्यासाठी ओळखला जातो. चेल्सीविरुद्धच्या या सामन्याच्या पूर्वार्धात माद्रिदने अपेक्षेनुसार सावध खेळ केला.

मध्यंतराला गोलशून्य बरोबरी

या सामन्यात चेल्सीला चेंडूवर बराच काळ ताबा राखण्यात यश आले. मार्कोस अलोन्सो आणि कॅलम हडसन-ओडोई यांनी चेल्सीला गोलच्या काही संधी निर्माण करून दिल्या. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आल्याने मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात चेल्सीने माद्रिदच्या बचावफळीवर अधिक दबाव टाकला. याचा फायदा त्यांना अखेर ६८ व्या मिनिटाला मिळाला. ऑलिव्हिएर जिरुडने गोल करत चेल्सीला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरपर्यंत राखत हा सामना १-० असा जिंकला.

बायर्न म्युनिकचा विजय 

गतविजेत्या बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लेगमध्ये लॅझिओचा ४-१ असा धुव्वा उडवला. या सामन्यात बायर्नकडून रॉबर्ट लेव्हनडोस्की, जमाल मुसियाला, लिरॉय साने आणि फ्रांसिस्को असेर्बि (स्वयं गोल) यांनी गोल केले. लॅझिओचा एकमेव गोल ग्वाकीन कोरियाने केला.

First Published on: February 24, 2021 9:38 PM
Exit mobile version