IPL 2020 : रायडू, जाडेजाची फटकेबाजी; दिल्लीविरुद्ध चेन्नईच्या १७९ धावा 

IPL 2020 : रायडू, जाडेजाची फटकेबाजी; दिल्लीविरुद्ध चेन्नईच्या १७९ धावा 

रविंद्र जाडेजा

अंबाती रायडू आणि रविंद्र जाडेजा यांनी अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली. चेन्नईची १७ षटकांनंतर ४ बाद १३४ अशी धावसंख्या होती. मात्र, रायडू आणि जाडेजा यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करत अखेरच्या तीन षटकांमध्ये ४५ धावा चोपून काढल्या. तसेच रायडू आणि जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५० धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यामुळेच चेन्नईला १७० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले.

डू प्लेसिसचे अर्धशतक 

शारजा येथे होत असलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा सलामीवीर सॅम करन खातेही न उघडता माघारी परतला. त्याला मुंबईकर तुषार देशपांडेने बाद केले. यानंतर मात्र फॅफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन या अनुभवी खेळाडूंनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. अखेर वॉटसनला (३६) एन्रिच नॉर्खियाने बाद करत ही जोडी फोडली. डू प्लेसिसने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. धोनीला (३) फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर मात्र रायडू (२५ चेंडूत नाबाद ४५) आणि जाडेजा (१३ चेंडूत नाबाद ३३) यांनी फटकेबाजी केल्यामुळे चेन्नईने २० षटकांत ४ बाद १७९ अशी धावसंख्या केली. दिल्लीकडून नॉर्खियाने २ विकेट घेतल्या.

First Published on: October 17, 2020 10:32 PM
Exit mobile version