IPL 2020 : युनिव्हर्स बॉस इज बॅक! गेलचे पंजाब संघात पुनरागमन 

IPL 2020 : युनिव्हर्स बॉस इज बॅक! गेलचे पंजाब संघात पुनरागमन 

क्रिस गेल

किंग्स इलेव्हन पंजाब संघाला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. सात सामन्यांत त्यांना केवळ एक सामना जिंकता आला असून सहा सामने त्यांनी गमावले आहेत. त्यामुळे हा संघ गुणतक्त्यात तळाला म्हणजेच आठव्या स्थानावर आहे. आज पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघासोबत होत आहे. यंदा पंजाबचा एकमेव विजय याच आरसीबी संघाविरुद्ध आला आहे. त्यामुळे या सामन्यात आरसीबीचे या पराभवाची परतफेड करण्याचे लक्ष्य आहे. मात्र, पंजाबचा संघ पुन्हा एकदा आरसीबीचा पराभव करण्यास उत्सुक असून त्यांनी आजच्या सामन्यासाठी विस्फोटक सलामीवीर क्रिस गेलची संघात निवड केली आहे.

माझ्यावर कसलाही दबाव नाही

क्रिस गेल हा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. मात्र, त्याला पंजाबच्या सुरुवातीच्या सातपैकी एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. परंतु, आरसीबीविरुद्ध आज होत असलेल्या सामन्यात गेलची पंजाब संघात निवड झाली आहे. माझ्यावर चांगली कामगिरी करण्याचा वैगरे अजिबातच दबाव नाही, असे आरसीबीविरुद्धचा सामना सुरु होण्याआधी गेल म्हणाला. ‘मी आज खेळणार आहे असे मला वाटते. मी सामना खेळण्यास खूप उत्सुक आहे. प्रत्येकच जण या संधीची वाट पाहत होता. आता युनिव्हर्स बॉसला पुन्हा एकदा मैदानात पाहण्याची चाहत्यांना संधी मिळणार आहे. मी लोकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर कसलाही दबाव नाही,’ असे गेल गमतीत म्हणाला.

 

 

First Published on: October 15, 2020 8:43 PM
Exit mobile version