Corona Effect : उन्हाळी क्रीडा शिबिरांना कोरोनाचा मोठा फटका!

Corona Effect : उन्हाळी क्रीडा शिबिरांना कोरोनाचा मोठा फटका!

उन्हाळी क्रीडा शिबिरांना कोरोनाचा मोठा फटका

मुलांच्या वार्षिक परीक्षा संपताच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाळी क्रीडा शिबिरांचा हंगाम सुरु झालेला असतो. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर खेळाडूंच्या कौशल्य वाढीसाठी आणि शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढीसाठी पालक कोणत्या ना कोणत्या शिबिरांमध्ये आपल्या पाल्याला टाकण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंतु, गेल्या वर्षी आणि यावर्षी कोरोनामुळे क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांची शिबिरे, तसेच अ‍ॅडवेंचर अ‍ॅक्टिव्हिटीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे शिबीर आयोजक व प्रशिक्षक यांना खूप मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

ऑनलाईन शिबिरांकडे खेळाडूंनी फिरवली पाठ 

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आयोजित होणारी उन्हाळी शिबिरे कोरोनामुळे बंद पडली आहेत. काही क्रीडा प्रकारांच्या ऑनलाईन होणाऱ्या शिबिरांकडे खेळाडू आणि पालकांनी यावर्षी पाठ फिरवली आहे. त्यामुळे उन्हाळी क्रीडा शिबिरे आयोजित करणारे क्लब, संस्था व प्रशिक्षक यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दरवर्षी ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक संस्थाच्या वतीने क्रीडा शिबिरे, तसेच अ‍ॅडवेंचर अ‍ॅक्टिव्हिटी यांचे आयोजन करण्यात येत होते. परंतु, कोरोनामुळे सर्व प्रकारच्या स्पर्धा, शिबिरे आणि आऊटडोअर दौरे यांना खेळाडू आणि प्रशिक्षक यांना मुकावे लागत आहे.

मागील वर्षी आणि यावर्षी क्रिकेटचे कोणतेही प्रशिक्षण शिबीर झाले नाही. त्यामुळे खेळाडू, तसेच आमच्या संस्थेला खूप मोठा आर्थिक फटका बसला असून संपूर्ण ग्राऊंडची देखभाल करणे, तसेच ग्राऊंड्समन यांना वेतन देणे अवघड झाले आहे.
– संतोष पाठक, क्रिकेट प्रशिक्षक
First Published on: May 4, 2021 9:08 PM
Exit mobile version