Corona Vaccination : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने सपत्नीक घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

Corona Vaccination : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने सपत्नीक घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने सपत्नीक घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शनिवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्याची पत्नी राधिकानेही लस घेतली. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून ३२ वर्षीय अजिंक्यने या सुविधेचा लाभ घेतला. त्याने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. ‘मी आज कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तुम्ही जर लस घेण्यासाठी पात्र असाल, तर तुमचे नाव नोंदवा आणि लसीकरण करून घ्या,’ असे आवाहनही अजिंक्यने त्याच्या ट्विटच्या माध्यमातून केले.

धवन, शास्त्रींनीही घेतली लस

अजिंक्यच्या आधी काही दिवस भारताचा सलामीवीर शिखर धवननेही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी त्यानेही सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले होते. भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित व्यक्तींमध्ये प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सर्वात आधी लस घेतली होती. त्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लसीकरण करून घेतले आहे. आता खेळाडूही लस घेताना दिसत. शनिवारी अजिंक्य रहाणे आणि त्याच्या पत्नीने लसीचा पहिला डोस घेतला.

उपकर्णधारपदी कायम 

आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी, तसेच त्यानंतर होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा झाली. अजिंक्य या संघाच्या उपकर्णधारपदी कायम आहे. तसेच त्याने फलंदाज म्हणून इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली असून यंदाही दमदार खेळ करण्याचे त्याचे लक्ष्य असेल.

First Published on: May 8, 2021 3:32 PM
Exit mobile version