जगातील सर्वोत्त्कृष्ट संघ उभारतोय!

जगातील सर्वोत्त्कृष्ट संघ उभारतोय!

पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे उद्गार

नुकत्याच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात सर्फराज अहमदच्या पाकिस्तान संघाला चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले. त्यांनी या स्पर्धेतील सुरुवातीच्या ६ पैकी ३ सामने गमावले होते. मात्र, यानंतर त्यांनी आपल्या खेळात सुधारणा करत अखेरचे तीनही सामने जिंकले, पण त्यांना ९ पैकी एकूण ६ सामनेच जिंकता आल्याने ते उपांत्य फेरीही गाठू शकले नाहीत. विश्वचषकातील साधारण कामगिरीमुळे सर्फराजचे कर्णधारपद काढून घेण्यात येईल, असे म्हटले जात होते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अजून याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. मात्र, सर्फराज कर्णधार असो वा नसो, पाकिस्तानचा संघ आगामी काळात उत्कृष्ट कामगिरी करेल, असा पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना विश्वास आहे. पाकिस्तान जगातील सर्वोत्त्कृष्ट संघ उभारत आहे, असे विधान त्यांनी अमेरिकेमध्ये बोलताना केले.

मी क्रिकेटपटू होतो, त्यावेळी इंग्लंडमध्ये जाऊन क्रिकेट खेळलो होतो आणि तिथे खूप गोष्टी शिकलो होतो. मी जेव्हा इंग्लंडमधून पुन्हा पाकिस्तानमध्ये आलो, तेव्हा मी माझ्या अनुभवातून इतर खेळाडूंना काही सल्ले दिले. याचा त्यांना खूप फायदा झाला. त्यांच्या खेळात सुधारणा झाल्यामुळे पाकिस्तानी संघाचा दर्जाही वाढला.

आता विश्वचषकानंतर मी पाकिस्तानच्या संघाला सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वोत्तम खेळाडूंनाच संघात घेणार आहोत. तसेच युवा खेळाडूंना संधी देणार आहोत. आम्ही जगातील सर्वोत्कृष्ट संघ उभारत आहोत. पुढील विश्वचषकात पाकिस्तानचा संघ व्यावसायिक पद्धतीने खेळेल. माझे हे शब्द लक्षात ठेवा, असे इम्रान खान म्हणाले.

First Published on: July 23, 2019 4:29 AM
Exit mobile version