रोहितच्या यशाचे श्रेय धोनीला!

रोहितच्या यशाचे श्रेय धोनीला!

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. खासकरुन एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये रोहितने मागील ७-८ वर्षांत फारच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, त्याआधी २००७ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या रोहितला मधल्या फळीत खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत होते. असे असतानाही तेव्हाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रोहितमधील प्रतिभा लक्षात घेऊन त्याला खूप पाठिंबा दिला. धोनीनेच त्याला २०१३ मध्ये सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी दिली आणि त्यानंतर रोहितने मागे वळून पाहिलेले नाही. त्यामुळे रोहितच्या यशाचे श्रेय धोनीलाच जाते, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले.

रोहित आज जे काही आहे, ते फक्त महेंद्रसिंग धोनीमुळेच. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाचा तुमच्यावर विश्वास असून उपयोग नाही. तुम्हाला जर कर्णधाराचा पाठिंबा नसेल, तर तुम्ही संघात टिकू शकत नाही. सर्व काही कर्णधाराच्याच हातात असते. रोहित सातत्यपूर्ण कामगिरी करत नव्हता. मात्र, असे असतानाही धोनीने रोहितला जितका पाठिंबा दिला, तितका कदाचितच इतर खेळाडूंना मिळतो, असे गंभीर म्हणाला.

आता रोहित आणि कर्णधार विराट कोहलीने युवा खेळाडूंना धोनीप्रमाणे पाठिंबा दिला पाहिजे असे गंभीरला वाटते. रोहित आता सिनियर खेळाडू आहे आणि तो शुभमन गिल, संजू सॅमसन यांसारख्या युवा खेळाडूंना पाठिंबा देईल अशी मला आशा आहे. खेळाडूला पाठिंबा दिला, तर तो कशाप्रकारे उत्कृष्ट क्रिकेटपटू बनू शकतो याचे रोहित उत्तम उदाहरण आहे. मला अपेक्षा आहे की धोनीने रोहित आणि कोहलीला ज्याप्रकारे घडवले, तसेच ते दोघे आताच्या युवा खेळाडूंना पाठिंबा देतील, असे गंभीरने नमूद केले.

विराटपेक्षा रोहित भारी!
काही दिवसांपूर्वी रोहित शर्माला वाढदिसाच्या शुभेच्छा देताना गंभीरने त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले होते. याबाबत विचारले असता गंभीरने सांगितले, रोहित हा एकमेव फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके, एका विश्वचषकात पाच शतके केली आहेत. तसेच तो जेव्हा शतक करुन बाद होतो, तेव्हा लोकांना वाटते की त्याचे द्विशतक हुकले. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली असून बर्‍याच फलंदाजांना कसोटीत तीन द्विशतके करता येत नाहीत. शेवटी रोहितपेक्षा विराट कोहली जास्त धावा करेल आणि विराट आताच क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, विराटपेक्षा रोहित उजवा आहे, कारण सामना आपल्या संघाच्या दिशेने क्षमता त्याच्यात जास्त आहे.

First Published on: May 4, 2020 5:39 AM
Exit mobile version