IPL 2020 : धोनी, फ्लेमिंगच्या विश्वासामुळे चेन्नईच्या खेळाडूंना यश मिळते!

IPL 2020 : धोनी, फ्लेमिंगच्या विश्वासामुळे चेन्नईच्या खेळाडूंना यश मिळते!

महेंद्रसिंग धोनी आणि स्टिफन फ्लेमिंग

सलामीवीर फॅफ डू प्लेसिस (नाबाद ८७) आणि शेन वॉटसन (नाबाद ८३) यांच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने पंजाबला १० विकेट राखून पराभूत केले. चेन्नईने यंदाच्या मोसमाची विजयाने सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला. मात्र, असे असतानाही चेन्नईने पंजाबविरुद्ध संघात एकही बदल केला नाही. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग दाखवत असलेल्या या विश्वासामुळेच चेन्नईच्या खेळाडूंना यश मिळते, असे पंजाबविरुद्ध मॅचविनर ठरलेले वॉटसन आणि फॅफ म्हणाले.

धोनी आणि फ्लेमिंगला श्रेय

मी चांगली फलंदाजी करत आहे. मी अखेरपर्यंत खेळपट्टीवर राहत संघाला विजय मिळवून देण्यास उत्सुक होतो. मी आणि वॉटसनने ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्याचा मला आनंद आहे. फलंदाजीत यशस्वी होण्यासाठी तुमच्यात आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. काही चांगल्या खेळी केल्यास फलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो. पुढील काही सामन्यांत आमचे सर्व फलंदाज फॉर्मात येतील अशी मला आशा आहे. आम्हाला मागील तीन सामने जिंकता आले नव्हते, पण आम्ही संघात बदल केला नाही. त्यामुळे धोनी आणि फ्लेमिंगला श्रेय मिळाले पाहिजे. इतर संघांपेक्षा चेन्नईचा संघ आपल्या खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवतो. त्यामुळे खेळाडूंना यश मिळते, असे फॅफ म्हणाला.

खेळाडूला हळूहळू फॉर्म गवसतो

तसेच वॉटसनने सांगितले, फ्लेमिंग आणि धोनी जे करत आहेत, ते फारच उत्कृष्ट आहे. ते खेळाडूंवर विश्वास दाखवतात. खेळाडूला संधी देत राहिल्यास त्याचा आत्मविश्वास वाढेल हे त्यांना माहित आहे. त्यांच्या विश्वासामुळेच प्रत्येक खेळाडूला हळूहळू फॉर्म गवसतो आणि ते चांगली कामगिरी करू लागतात.

First Published on: October 5, 2020 6:36 PM
Exit mobile version