IND vs AUS : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका झाली, हे खरे! क्रिकेट ऑस्ट्रेलियाची माहिती 

IND vs AUS : भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका झाली, हे खरे! क्रिकेट ऑस्ट्रेलियाची माहिती 

मोहम्मद सिराज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच पार पडली. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टीका झाली होती. याबाबत भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयने सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा वर्णद्वेषी टीका झाल्यावर सिराजने याबाबत पंचांकडे तक्रार केली. त्यामुळे सहा चाहत्यांना मैदानाबाहेर काढण्यात आले होते. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) या प्रकरणाचा तपास सुरु ठेवला होता. आता त्यांनी याबाबतचा अहवाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) सुपूर्द केला असून भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका झाली या माहितीवर शिक्कामोर्तब केले आहे.

दोषी व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न

सिडनी कसोटीत भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका झाली होती यावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया शिक्कामोर्तब करत आहे. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज, तिकीट खरेदी केलेल्या व्यक्तींची माहिती, तसेच प्रेक्षकांच्या मुलाखती घेऊन आम्ही या प्रकरणाबाबत अधिक माहिती मिळवण्याचा आणि दोषी व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयसीसीला दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली माफी 

तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंची माफी मागितली आहे. बॉर्डर-गावस्कर मालिका ऑस्ट्रेलियात पार पडली. त्यामुळे घडलेल्या प्रकाराबद्दल यजमान म्हणून आम्ही भारतीय पुरुष क्रिकेट संघाची माफी मागतो, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अहवालात लिहिले.


हेही वाचा – आयपीएल खेळाडू लिलाव ‘या’ तारखेला चेन्नईत!


 

First Published on: January 27, 2021 10:07 PM
Exit mobile version