कॅरिबियनमध्ये क्रिकेटच सर्वात महत्त्वाचे!

कॅरिबियनमध्ये क्रिकेटच सर्वात महत्त्वाचे!

Chris Gayle

एकेकाळी जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेस्ट इंडिजसाठी मागील काही काळ चढ-उतारांनी भरलेला आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू आणि अधिकारी यांच्यात बराच वाद झाला होता. त्यामुळे बर्‍याच खेळाडूंनी या संघाकडून खेळण्यापेक्षा जगातील विविध टी-२० स्पर्धांत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वेस्ट इंडिजला मागील काही वर्षे चांगली कामगिरी करण्यात वारंवार अपयश येत होते. मात्र, आता मैदानात आणि मैदानाबाहेरही वेस्ट इंडिज क्रिकेटला पुन्हा चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आगामी विश्वचषक जिंकण्याचा प्रमुख दावेदार मानल्या जाणार्‍या इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका चांगले प्रदर्शन केले होते. तसेच क्रिकेट वेस्ट इंडिज आणि निवड समिती यांचे नवे अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. कॅरिबियनमध्ये क्रिकेटच सर्वात महत्त्वाचे असल्याने, या सर्व बदलांमुळे वेस्ट इंडिज क्रिकेट अजून प्रगती करेल, अशी त्यांचा अनुभवी खेळाडू क्रिस गेलला आशा आहे.

मागील काही महिन्यांत आमच्या क्रिकेट बोर्डात बरेच बदल झाले आहेत. आता नवे सदस्य योग्य ते निर्णय घेतील अशी मला आशा आहे. कॅरिबियनमध्ये क्रिकेटच सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे खेळाडू आणि नवे सदस्य मिळून वेस्ट इंडिज क्रिकेटला पुन्हा उंचीवर नेऊन ठेवतील अशी मला आशा आहे. मात्र, हे लगेच होणार नाही. हे बदल होण्यासाठी काही काळ लागेल. आम्ही इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगले प्रदर्शन केले होते आणि आता विश्वचषकातही आमची प्रतिभा दाखवण्याची आम्हाला चांगली संधी मिळणार आहे, असे गेल म्हणाला.

गेलने १०३ कसोटी आणि २८९ एकदिवसीय सामन्यांत वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आता मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर फक्त चाहत्यांच्या प्रेमासाठी खेळतो, असे गेम म्हणाला. खरे सांगायचे तर मी चाहत्यांसाठी खेळत आहे. काही वर्षांपूर्वी निवृत्तीचा विचार माझ्या मनात आला होता, पण तेव्हा चाहत्यांनी मला तसे करण्यापासून अडवले. त्यांच्या इतक्या प्रेमामुळेच मी खेळत आहे. कोणतीही गोष्ट कायम टिकत नाही हे मला ठाऊक आहे आणि आता विश्वचषकाच्या काही सामन्यांत त्यांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेणार आहे, असे गेलने सांगितले.

First Published on: May 16, 2019 4:34 AM
Exit mobile version