आयसीसीने केले झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित

आयसीसीने केले झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित

झिम्बाब्वे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिम्बाब्वे क्रिकेटला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे आयसीसीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पूर्णकालीन सदस्यत्व प्राप्त संघावर आयसीसीने निलंबनाची कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नुकत्याच लंडनमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. झिम्बाब्वेमध्ये जे झाले, ते आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करणारे होते, असे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर म्हणाले.

आम्ही कोणत्याही संघाच्या सदस्यत्वाबाबतचा निर्णय अतिशय गांभीर्याने घेतो. खेळ आणि राजकारण वेगळे ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. खेळात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. झिम्बाब्वेमध्ये जे झाले, ते आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करणारे होते. झिम्बाब्वेमध्ये क्रिकेट सुरू रहावे अशी आयसीसीची इच्छा आहे, पण त्यासाठी त्यांनी आयसीसीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे शशांक मनोहर म्हणाले.

आयसीसीचे पूर्णकालीन सदस्यत्व प्राप्त असलेल्या झिम्बाब्वेला क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेणे शक्य झाले नाही. सरकारी हस्तक्षेप मोडून काढण्यातही त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे आयसीसीने त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले. या कारवाईमुळे झिम्बाब्वे क्रिकेटला आयसीसीकडून कोणताही निधी मिळणार नाही. तसेच आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत झिम्बाब्वेच्या संघाला सहभागी होता येणार नाही. ऑक्टोबरमध्ये पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी होणार आहे. आयसीसीने निलंबनाची कारवाई केल्यामुळे झिम्बाब्वेच्या या पात्रता फेरीतील सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आम्ही आता काय करायचे? -सिकंदर रझा

आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेटला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अपेक्षेनुसार झिम्बाब्वेचे खेळाडू निराश झाले आहेत. त्यांचा अष्टपैलू सिकंदर रझा म्हणाला, आम्हाला आयसीसीच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. माझी कारकीर्द अशी संपेल असे वाटले नव्हते. ही कारवाई एका खेळाडूवर नाही, तर देशावर करण्यात आली आहे. आता मी आणि माझ्या सहकार्‍यांनी काय करायचे? आमच्या संघावर ही कारवाई किती काळासाठी करण्यात आली आहे हे माहीत नाही. आता आम्ही किमान क्लब क्रिकेट खेळू शकतो का? आम्ही किट जाळून टाकून दुसरे काहीतरी काम करायचे का?, असे विविध प्रश्न आमच्यासमोर आहेत.

First Published on: July 20, 2019 4:47 AM
Exit mobile version